MLC Election: विभागीय आयुक्तालयात अर्ज दाखलची सुविधा

शिक्षक निवडणूक pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – बहुचर्चित नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी शुक्रवारी (दि. ३१) रणधुमाळी सुरू होत आहे. निवडणुकीच्या दृष्टीने महसूल प्रशासन सज्ज झाले आहे. नाशिक रोड येथील विभागीय महसूल आयुक्तालयात सकाळी ११ ते दुपारी 3 या वेळेत अर्ज विक्री तसेच दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असणार आहे.

लोकसभेनंतर अवघ्या विभागाचे लक्ष लागून असलेल्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव व नगर अशा पाच जिल्ह्यांत शिक्षक मतदारसंघाचे कार्यक्षेत्र विस्तारलेले आहे. विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी राधाकृष्ण गमे हे शुक्रवारी (दि. ३१) निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करतील. त्या क्षणापासूनच इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे.

नाशिक रोड येथील विभागीय आयुक्तालयात आयुक्त गमे तसेच अपर आयुक्त तथा सहायक निवडणूक अधिकारी नीलेश सागर यांच्याकडे अर्ज दाखल करता येतील. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ७ जून असून, सुटीचा दिवस वगळून सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे. दरम्यान, नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी यंदा महायुती तसेच महाआघाडीमध्ये इच्छुकांची संख्या अधिक आहे. तसेच विविध शिक्षक संघटनांनीदेखील उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

निवडणूक कार्यक्रम

  • ३१ मे : अर्ज दाखल करण्यास प्रारंभ
  • ७ जून : अर्ज भरायचा अंतिम दिवस
  • १० जून : दाखल अर्जांची छाननी
  • १२ जून : माघारीसाठी अंतिम मुदत
  • २६ जुन : सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान
  • १ जुलै : नाशिक येथे मतमोजणी

हे पण महत्त्वाचे

  • महसूल विभागीय आयुक्तालयात अर्ज विक्री-स्वीकृती.
  • उमेदवारी अर्जावर 10 सूचकांची स्वाक्षरी आवश्यक.
  • शिक्षक मतदारसंघ यादीतील शिक्षकच सूचक असावेत.
  • खुल्या प्रवर्गासाठी १० हजार अनामत रक्कम.
  • राखीव प्रवर्गाकरिता ५ हजार रुपये अनामत रक्कम.
  • राखीव प्रवर्गातील उमेदवाराला अर्जासोबत जात-प्रमाणपत्र देणे आवश्यक.

हेही वाचा: