
नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर तालुक्यात दिनांक १८ एप्रिल रोजी २ आणि २ मे रोजी ५ असे एकूण सात बालविवाह महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सजगतेने थांबवले गेले.
राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या सायली पालखेडकर यांना त्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने नाशिक जिल्हा बालविकास प्रकल्प अधिकारी आणि पोलिस प्रशासन यांना निर्देश दिले. याबाबत तालुकास्तरावर वरिष्ठांचे आदेश प्राप्त होताच बालविकास प्रकल्प अधिकारी, कर्मचारी आणि पोलिस यांनी तातडीने बालविवाह होत असलेल्या ठिकाणावर जाऊन तेथे संबंधित मुला-मुलींच्या पालकांचे प्रबोधन केले. तसेच वय पूर्ण झाल्यानंतर लग्न करणार, असे लेखी जबाब घेतले. याचा सर्व अहवाल राज्य बालहक्क संरक्षण आयोगाला पाठविण्यात आला आहे. यामध्ये दिनांक २ मे रोजी ३ मुली आणि २ मुले अल्पवयीन होते. लग्न करण्यास पुढे सरसावलेल्या त्यांच्या पालकांना शासन अधिकाऱ्यांनी बालविवाहाचे दुष्परिणाम समजावून सांगितले. यावर पालकांनीदेखील त्यांचे लग्न करणार नसल्याचे कबूल केले. याबाबत बालविकास प्रकल्प अधिकारी लक्ष ठेवून आहेत. दरम्यान त्र्यंबकेश्वर तालुक्यात यापुढे अधिक प्रबोधन करण्याची आवश्यकता असल्याची मागणी होत आहे.
लहान वयात लग्न झाल्याने अनेक समस्या निर्माण होतात. संतती कुपोषित होते. मातेचे आरोग्य खालवते. यासाठी बालविवाह टाळणे अत्यंत गरजेचे आहे.
– सायली दीपक पालखेडकर, सदस्या महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग
हेही वाचा :
- वाल्हे : शेतकरी मान्सूनपूर्व मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत
- Ronaldo : फोर्ब्जच्या सर्वाधिक श्रीमंत खेळाडूंच्या यादीत रोनाल्डोची बाजी; मेस्सी दुसर्या स्थानावर
- Seeds For Kharif Season : खरीप हंगामासाठी बियाण्यांचा पुरेसा साठा ठेवा : केंद्र सरकारचा राज्यांना सल्ला
The post Nashik : बालहक्क आयोगाने रोखले त्र्यंबकेश्वरमधील सात बालविवाह appeared first on पुढारी.