Nashik | विशेष पोलिस महानिरीक्षक पदी दत्तात्रय कराळे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर हे शनिवारी (दि.३१) सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या रिक्त जागी दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती होणार आहे. कराळे यांची जानेवारी महिन्यात नाशिकमध्ये बदली झाल्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डॉ. शेखर यांनी मार्चमध्ये पुन्हा पदभार स्वीकारला होता. मात्र, डॉ. शेखर यांच्या सेवानिवृत्तीनंतर पुन्हा कराळे यांच्याकडे नाशिक परिक्षेत्राचा पदभार येण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ३१ जानेवारी २०२४ रोजी गृह विभागाने नाशिकचे आयजी डॉ. शेखर यांची बदली पुणे येथील मोटार परिवहन विभागात करण्यात आली. तर ठाणे शहराचे सहआयुक्त दत्तात्रय कराळे यांच्याकडे नाशिक परिक्षेत्राची जबाबदारी सोपविण्यात आली. २ फेब्रुवारी रोजी कराळे यांनी परिक्षेत्राची सूत्रे हाती घेतली. परंतु, डॉ. शेखर यांनी ‘कॅट’मध्ये याचिका दाखल केली होती. त्यामुळे कॅटच्या निर्णयानुसार डॉ. शेखर यांच्या बदलीस स्थगिती देत त्यांची पुन्हा नाशिक परिक्षेत्रात नियुक्ती देण्याचे आदेश दिले. त्यानुसार २० मार्च रोजी डॉ. शेखर यांनी पदभार स्वीकारला होता. त्यानंतर कराळे यांच्या नव्या नियुक्तीचे आदेश निर्गमित झालेले नव्हते. त्यामुळे डॉ. शेखर यांच्या सेवानिवृत्तीनंतर पुन्हा कराळे यांच्याकडे नाशिकची सूत्रे जाणार आहेत.

हेही वाचा: