Nashik : एकही बंडखोर निवडून येता कामा नये- संजय राऊत

संजय राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकमधील बंडाचे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाशिक गाठत शिवसेनेतून (ठाकरे गट) बाहेर पडलेले बंडखोर नेते दादा भूसे यांच्यासह सुहास कांदे आणि हेमंत गोडसे तसेच इतरही बंडखोर हे पुन्हा निवडून येता कामा नये, अशा स्वरूपाचे आदेश शिवसैनिकांना दिले आहेत. यामुळे आगामी काळात नाशिकमधून संभाव्य माजी नगरसेवकांचे बंड होणार की ते थंडावणार याकडे लक्ष लागून आहे.

यापुढे नेता नव्हे, तर पक्ष हाच प्रत्येकाचा चेहरा असेल असे सांगत नाशिक लाेकसभा मतदार संघाच्या आगामी निवडणुकीत गोडसेंचे डिपॉझीट जप्त करण्याचे संकेत त्यांनी दिले. नाशिकमधील बाराहून अधिक माजी नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेनेत दाखल होणार असल्याचे वृत्त पसरल्याने डॅमेज कंट्राेलसाठी राऊत यांनी नाशिक गाठले. राऊत यांनी शुक्रवारी (दि.२) महत्वाच्या पदाधिकारी तसेच माजी नगरसेवकांशी चर्चा करीत अडचणी जाणून घेतल्या तसेच अंतर्गत गटबाजी वा वादाची कारणे काय आहेत याबद्दल चाचपणी केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक म्हणून उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहनही खासदार राऊत यांनी केले. पक्षाच्या प्रतिकुल परिस्थितीत साथ देणाऱ्यांना नक्कीच न्याय दिला जाताे, अशा स्वरूपाची समजूत घालून संबंधित नगरसेवकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न झाल्याचे वृत्त आहे. भुसे, गाेडसे तसेच कांदे यांच्या मतदार संघातील राजकीय स्थितीचा आढावा घेत संबंधित ठिकाणी शिवसेनेचे संभाव्य उमेदवार कोण असू शकतात आणि त्यासाठी आतापासूनच तयारीला लागण्याचे आदेश त्यांनी दिले.

सेनेचा संभाव्य उमेदवार सूचित

नाशिक लाेकसभा मतदार संघाचे खासदार गाेडसे यांच्यावर राऊत यांनी टीका करत गोडसे यांचे राजकीय करियर संपल्याचे सांगत शिवसेनेमुळे गाेडसेंचे करियर घडले. मात्र त्याचा त्यांना विसर पडल्याने शिवसेनेत नेते नाही तर पक्ष हाच चेहरा असताे, खरे ना विजय असे जिल्हाप्रमुख करंजकर यांच्याकडे पाहत खासदारकीसाठी शिवसेनेचा संभाव्य दावेदार कोण असू शकतो हे देखील सूचित केले.

हेही वाचा :

The post Nashik : एकही बंडखोर निवडून येता कामा नये- संजय राऊत appeared first on पुढारी.