Nashik : गोंदेगावामध्ये ‘आशा’ पहिली महिला पोलिस, कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू

आशा बनली पोलिस,www.pudhari.news

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा

गृहविभागाने नुकत्याच घेतलेल्या पोलिस भरतीत गोंदेगाव (ता. निफाड) येथील आशा अरुण जगदाळे या युवतीची ठाणे शहर पोलिस दलात निवड झाली आहे. ठाणे शहर पोलिस सहआयुक्त दत्तात्रय कराळे यांनी बुधवारी (दि. १२) जाहीर केलेल्या निवड यादीत आशाचा समावेश आहे. मुलीने घेतलेल्या कष्टाचे चीज झाल्याचे समजताच जगदाळे कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले. पोलिस होण्याचे स्वप्न बाळगून परिश्रम करणारी आशा गोंदेगावमधील पहिली महिला पोलिस ठरली आहे.

गोंदेगाव येथील अरुण जगदाळे यांचे तीन भावांचे एकत्रित मोठे कुटुंब आहे. इतर भावंडांपैकी आशा जगदाळे हिनेच पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. वडील अरुण हे निफाड पंचायत समितीच्या सार्वजनिक बांधकाम शाखेत कर्मचारी आहेत. तर आई गृहिणी असून, इतर कौटुंबिक सदस्यांसोबत शेती सांभाळते. आशा ही मुलींपैकी सर्वांत लहान असून, धाकड म्हणून प्रसिद्ध आहे. लहानपणापासून तिने पोलिस होण्याचे स्वप्न बघितलेले होते. त्यासाठी हवी ती मेहनत घेण्याची तयारीही तिची होती, असे तिच्या मैत्रिणी सांगतात. तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण गोंदेगावमध्ये झाले. त्यानंतर मात्र तिने भरती डोळ्यांसमोर ठेवून मेहनत सुरू केली. महाविद्यालयीन शिक्षण आणि पोलिस भरतीची तयारी सोबतच सुरू होती. लासलगाव महाविद्यालयातून शैक्षणिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर वर्दी मिळवायचीच या आशेने तिने नाशिक गाठण्याचा निर्णय घेतला. या निर्णयास तिच्या वडिलांनी भक्कम पाठिंबा दिल्याचे तिने सांगितले.

भरतीचे प्रशिक्षण देणाऱ्या अकॅडमीतील शिक्षकांच्या मार्गदर्शनात तिने मेहनत सुरू केली. मैदानी कसरतसह लेखी परीक्षेचाही अभ्यास तिथेच सुरू केला. पोलिस सेवेव्यतिरिक्त अन्य कोणत्याच सुरक्षा विभागात जाणार नसल्याचे तिचे ठाम मत होते. त्यामुळे इतर कोणत्याच परीक्षेची तयारी केली नाही. त्यात गृह विभागाने पोलिस भरती नुकतीच जाहीर केली होती. यामध्ये ठाणे पोलिस भरतीमध्ये तिने फॉर्म भरला. यात उत्तीर्ण होण्यासाठी जिवाचे रान करत मेहनत घेतली. मैदानीसाठी ४३ व लेखी परीक्षेसाठी ८१ असे १२४ गुण मिळवून पहिल्याच प्रयत्नात यश संपादित केले. या निवडीमुळे निफाड पूर्व भागातील शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी ‘आशा’ प्रेरक ठरली आहे. या यशामुळे गोंदेगाव आणि परिसरातून जगदाळे कुटुंबीयांचे अभिनंदन होत आहे.

The post Nashik : गोंदेगावामध्ये 'आशा' पहिली महिला पोलिस, कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू appeared first on पुढारी.