Nashik : बैलजोड्या महाग अन् ट्रॅक्टर परवडत नसल्याने औताला जुंपले घोडे

औताला जुंपले घोडे,www.pudhari.news

कवडदरा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

घोडा हा प्राणी सध्या लग्नाच्या वरातीत किंवा शर्यतीसाठी बघत असलो, तरी इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील एका शेतकऱ्याने मात्र बैलाऐवजी चक्क दोन घोड्यांना औताला जुंपले आहे. थेट घोड्यांच्या सहाय्याने शेत नांगरणीस सुरुवात केल्यामुळे हा प्रकार तालुक्यामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

येथील शेतकरी हनुमंता निसरड यांना शंकरपटाचा शौक असल्याने त्यांनी घोड्याचे दोन शिंगरू प्रत्येकी सात हजार रुपये प्रमाणे खरेदी केले. त्‍यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असून शेतीसाठी बैलजोडी नव्हती. त्‍यात ट्रॅक्‍टरने मशागत करणेही त्‍यांना परवडत नसल्‍याने त्‍यांनी शेतीत हा अनोखा प्रयोग करण्याचे ठरवत घोडे वापरले आहेत. उन्हाळ्यात शेत वखरणीचे काम घोड्याच्या सहाय्याने केले जात आहे. विशेष म्हणजे याच घोड्यावरून शेतात ये-जा आणि किरकोळ शेती साहित्याची वाहतूक ते करतात. वखरणी, उन्हाळी मिरची आणि सोयाबीन पिकाच्या कोळपणीसाठीही बैलांपेक्षा दुप्पट गतीने हे घोडे काम करत आहेत.

बैलजोडी घेणे परवडत नाही. त्यामुळे केवळ शौक म्हणून पाळलेल्या घोड्यांना काहीतरी काम असावे म्हणून निसरड हे बैलांऐवजी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून घोड्यांवर शेती करत आहेत. घोडे वापरल्याने शेतातील मशागतीचे काम जलद होत असल्याचे ते सांगतात. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग आणि संकल्पना उदयास येत आहेत. बैलजोडीची जागा आता आधुनिक तंत्रज्ञानाने घेतली आहे. मात्र ग्रामीण भागात अजूनही काही शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी बैल मिळत नाहीत. ट्रॅक्टरचे भाव परवडत नाहीत. त्यामुळे निसरड यांच्यासारख्या शेतकऱ्यांना पाळलेल्या घोड्यांना थेट औताला जुंपावे लागले आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे बैल आहेत, ते इतरांकडून दीड ते दोन हजार भाडे घेतात. त्यामुळे आम्ही ही सर्व शेती घोड्याच्या सहाय्याने करतो. आता आम्हाला शेती परवडते. औताला घोडा जुंपतो त्यावेळी येणारे-जाणारे लोक कुतूहलाने बघतात. पण आम्हा गरिबाला हा घोडा खूप कामाचा आहे.

– हनुमंता निसरड, शेतकरी

हेही वाचा : 

The post Nashik : बैलजोड्या महाग अन् ट्रॅक्टर परवडत नसल्याने औताला जुंपले घोडे appeared first on पुढारी.