Nashik : मुंबई आग्रा महामार्गावर कंटेनरला आग, प्रसंगावधान राखल्याने चालक बचावला

कंटेनरला आग,www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
तीन दिवसांपूर्वी सिन्नर नाशिक मार्गावर शिंदे टोल जवळ बस जळाल्याची घटना ताजी असतानाच मुंबई आग्रा महामार्गावर जळगावकडे जाणाऱ्या कंटेनरला सिडकोतील अश्विननगर सोनाली मटण भाकरी समोर भीषण आग लागल्याची घटना घडली. अग्नीशामक दलाने आग विझविली. मात्र, या आगीत कंटेनरचा पुढील भाग जळून खाक झाला.

मुंबई आग्रा महामार्गावर जळगावकडे जाणाऱ्या कंटेनरला सिडकोतील अश्विननगर सोनाली मटण भाकरी समोर रविवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली होती. चालकाने प्रसंगावधान राखत रस्त्याच्या बाजूला कंटेनर लावून उडी मारली. यावेळी सोनाली मटण भाकरी हॉटेल जवळ उभे असलेले सामाजिक कार्यकर्ते पिंटू काळे यांनी घटनेची माहिती अग्निशामक दलाला दिली. तसेच आरपीआय चे महानगरप्रमुख प्रशांत जाधव, समाधान ठोके, संदीप पवार, दीपक सोनावणे, प्रदीप चव्हाण यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले.

तसेच अंबड पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच अग्निशामकचे कर्मचारी त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशामक दलाचे कर्मचारी यांनी आग विझवली, डिझेल टँक वाचविल्याने पुढील अनर्थ टळला. या बॅटरी शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. पुढील तपास अंबड पोलिस करीत आहेत.

हेही वाचा :

The post Nashik : मुंबई आग्रा महामार्गावर कंटेनरला आग, प्रसंगावधान राखल्याने चालक बचावला appeared first on पुढारी.