Nashik : वाहतूक कोंडी, अपघात नियंत्रणासाठी बाह्य रिंगरोडची शिफारस

रिंगरोड,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

वाहतूक नियमांच्या उपाययोजनांअभावी शहरात अपघात वाढल्याचा अहवाल रेझिलिएन्ट इंडिया कंपनीने मंगळवारी (दि.२०) महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना सादर केला. वाहतूक कोंडी आणि अपघात कमी करण्यासाठी बाह्य रिंगरोडची निर्मिती तसेच द्वारका ते दत्तमंदिर आणि मिरची चौक ते नांदूर नाका या भागात उड्डाणपूल उभारण्याची सूचना कंपनीने केली आहे. त्याचबरोबर वाहन वेगावर मर्यादा घालण्यासाठी २३ ब्लॅक स्पॉटवर सिग्नल, सीसीटीव्ही कॅमेरे उभारून ‘ई-चलान’ लागू करण्याची शिफारस केली आहे.

औरंगाबाद महामार्गावर मिरची चौकात झालेल्या खासगी बसच्या अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील ब्लॅक स्पॉटचे सर्वेक्षण करून उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले होते. पोलिस यंत्रणेमार्फत २८ ब्लॅक स्पॉटची यादी रेझिलिएन्ट इंडिया कंपनीला सादर करण्यात आली होती. कंपनीने ४५ दिवस सर्वेक्षण करत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव चौबे व रिस्क मॅनेजमेंट एक्स्पर्ट प्रियंका लखोटे यांनी मंगळवारी (दि.२०) अहवाल आयुक्तांना सादर केला. सर्वेक्षणात २८ पैकी मनपा हद्दीतील २६ ब्लॅक स्पॉटस्च्या ठिकाणी तीन वर्षांत झालेल्या अपघातांचे प्रमाण, त्यामागील कारणे, धावणाऱ्या वाहनांची संख्या, वाहतूक कोंडी व त्याची कारणे या बाबींचा अभ्यास करण्यात आला. यानंतर काही शिफारशी करण्यात आल्या असून, ब्लॅक स्पॉटवरील अपघात कमी करण्यासाठी गतिरोधक टाकणे, झेब्रा क्रॉसिंग, व्हाइट स्ट्रीप, दिशादर्शक फलक, दृश्यमानता वाढविणे या उपाययोजना तत्काळ करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

अपघातात मृत्यूचे प्रमाण ९३ टक्के

तीन वर्षांतील अपघातांची कारणमिमांसा सर्वेक्षणात करण्यात आली. अपघातांमध्ये पादचारी आणि दुचाकीस्वारांच्या अपघातांचे प्रमाण ९३ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे समोर आले आहे. २०१९-२० मध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वारांच्या मृत्यूचे प्रमाण ५५ टक्के, तर पादचारी मृत्यूचे प्रमाण २७ टक्के, २०२०-२१ मध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण ६२ टक्के, तर पादचाऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण २६ टक्के होते. २०२१-२२ मध्ये अपघातात दुचाकीस्वारांचे ६५ टक्के, तर पादचारी २८ टक्के मृत्यूचे प्रमाण होते. महापालिकेने शिफारशींची अंमलबजावणी केल्यास २० टक्के अपघात तत्काळ कमी होतील, असा दावा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव चौबे यांनी केला आहे.

मुंबई नाक्याचे वाहतूक बेट कमी करणार

रेझिलिएन्ट इंडियाने सुचविलेल्या अहवालानुसार मुंबई नाक्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक बेटाचा आकार कमी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. शहरातून ११४ किमी लांबीचे राष्ट्रीय तसेच राज्य महामार्ग जातात. या महामार्गांवरील वाहतूक शहराबाहेरून जाण्यासाठी बाह्य रिंगरोडची शिफारस करण्यात आली असून, २६ पैकी २३ ब्लॅक स्पॉटवर सिग्नल बसविण्याची सूचना करण्यात आली आहे.

वाहतुकीसंदर्भातील सर्वेक्षण अहवाल आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. अहवालात अनेक शिफारशी करण्यात आल्या असून, त्याविषयी तत्काळ निविदा प्रक्रिया राबवून उपाययोजना हाती घेतल्या जाणार आहेत. औरंगाबाद रोडवरील उड्डाणपुलाचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे.

– नितीन वंजारी, शहर अभियंता, मनपा

हेही वाचा :

The post Nashik : वाहतूक कोंडी, अपघात नियंत्रणासाठी बाह्य रिंगरोडची शिफारस appeared first on पुढारी.