Nashik Child Trafficking : अखेर ती 30 बालके बिहारला रवाना

बालतस्करी प्रकरण, www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मानवी तस्करीच्या कथित प्रकरणात गेल्या सोळा दिवसांपासून नाशिकच्या बालगृहात मुक्कामी असलेल्या बिहारच्या ३० बालकांचा शुक्रवारी (दि.१६) घराकडील प्रवास सुरू झाला. नाशिकरोड रेल्वेस्थानकातून बंदोबस्तामध्ये ही बालके गुवाहाटी एक्स्प्रेसने बिहारकडे रवाना झाली. यावेळी मुलांच्या पालकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. (Nashik Child Trafficking)

गेल्या महिन्याच्या ३१ तारखेला जळगाव ते मनमाडदरम्यान बिहारवरून आलेल्या एका रेल्वेगाडीतून रेल्वे पोलिसांनी ५९ बालकांची सुटका केली. या प्रकरणातील २९ मुले भुसावळ, तर उर्वरित ३० मुलांना नाशिक बालनिरीक्षण गृहात ठेवण्यात आले होते. त्यानंतर मानवी तस्करीचे हे प्रकरण राज्यभर गाजले. या प्रकरणातील ३० मुलांना शुक्रवारी (दि.१६) गुवाहाटी एक्स्प्रेसने बिहारकडे रवाना करण्यात आले. प्रवासात बालकांसोबत महिला व बालविकास विभागाचे दोन व बालगृहाचे तीन असे पाच अधिकारी तसेच शहर पोलिस आहेत. याव्यतिरिक्त मुलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) आणि जीआरपी (गर्व्हमेंट रेल्वे पोलीस) तैनात असतील.

बालकांना घेऊन निघालेली टीम शनिवारी (दि. १७) बिहारमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर या बालकांना तेथील अरेरिया आणि पूर्णिया जिल्ह्याच्या बालकल्याण समितीकडे सुपूर्द केले जाणार आहे. तेथील समितीच पुढील सर्व कार्यवाही पूर्ण करत बालकांना त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात देईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, चार दिवसांपूर्वी जळगाव प्रशासनाने भुसावळ येथून २९ मुलांना त्यांच्या मूळ गावी रवाना केले होतेे. (Nashik Child Trafficking)

अर्धी बोगी बुकिंग

गुवाहाटी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या बालकांसाठी व त्यांच्यासोबतच्या अधिकाऱ्यांसाठी प्रशासनाने रेल्वेची अर्धी बोगी बुकिंग केली. त्याचवेळी या मुलांचे पालक मात्र याच रेल्वेगाडीत दुसऱ्या बोगीतून प्रवास करताहेत. मुले घरी परतणार असल्याने पालकांच्या चेहऱ्यावर समाधान होते. पालकांच्या १६ दिवसांच्या संघर्षाच्या काळात नाशिकमधील काही सामाजिक संघटनांनी पुढे येत या पालकांना मदतीचा हात दिला.

पालकांची झाली दैना

रेल्वे पोलिसांनी ३१ मे रोजी बिहारवरून येणाऱ्या गाडीतून बालकांची सुटका केली होती. ही वार्ता समजताच मुलांच्या पालकांनी नाशिक गाठले. मुलांच्या ताब्यासाठी पालकांनी प्रशासनाचे उंबरठे झिजवले. पण प्रशासनाने सर्वतोपरी कार्यवाही पूर्ण झाल्यावर मुलांना परत पाठविण्यात येईल, असे स्पष्ट केले. अनोळखी शहरात कोणीच नसल्याने सोळा दिवसांपासून हे पालक शहरात मिळेल तेथे वास्तव्य करत होते.

सध्या मुलांना आमच्या ताब्यात दिले नसले तरी गावी परतल्यानंतर स्थानिक पातळीवर सर्व प्रक्रिया पार पाडून त्यांना आमच्याकडे सुपूर्द केले जाणार आहे. अनोळखी शहरापेक्षा घराकडे मुले परतत असल्याचा आनंद आहे. तेथील सर्व प्रक्रियेत आणखीन काहीकाळ गेला तरी चालेल.

– मोहम्मद वारीस, पालक

हेही वाचा :

The post Nashik Child Trafficking : अखेर ती 30 बालके बिहारला रवाना appeared first on पुढारी.