Nashik Crime : फुकटात कोल्ड्रिंक, नाश्त्या दिला नाही म्हणून टोळक्याने दुकानच फोडले

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा

सातपूर, नाशिक शहरात सध्या गुन्हेगारीने कळस गाठला आहे. खून, गोळीबार, प्राणघातक हल्ले, लूटमारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. फुकटात कोल्ड्रिंक आणि नाश्ता दिला नाही म्हणून सहा-सात जणांच्या टोळक्याने येथील मिठाई व्यावसायिकास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत दुकान फोडल्याची घटना सातपूर परिसरात समोर आली आहे. रविवारी (दि.30) सायंकाळी घडलेला हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या प्रकरणी संशयितांना सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

फिर्यादी व दुकान मालक मोहनलाल पुनाजी चौधरी (४६) यांचे त्र्यंबक रोडवर महिंद्रा सर्कलवर मिठाई दुकान आहे. रविवारी (दि.३०) सायंकाळी ५ च्या दरम्यान सात जणांच्या टोळक्याने नाश्ता व थंडपेय घेतले. दुकान मालक चौधरी यांनी पैसे मागितल्यानंतर संशयित अभिजित साबळे (१८), ओम डाकरेज (१८, रा. महादेववाडी, सातपूर) व इतर अज्ञात सहा साथीदारांनी खुर्चीसह लाथाबुक्क्याने जबरदस्त मारहाण करून काउंटरची तोडफोड केली. या प्रकरणी सोमवारी (दि.१) रात्री उशिराने चौधरी यांच्या फिर्यादीवरून सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी पोलिस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज भालेराव, पोलिस उपनिरीक्षक उबाळे, वाघ यांनी पाहणी करून घटनास्थळावरून अधिक माहिती घेतली आहे.

हेह वाचा : 

The post Nashik Crime : फुकटात कोल्ड्रिंक, नाश्त्या दिला नाही म्हणून टोळक्याने दुकानच फोडले appeared first on पुढारी.