Nashik Crime : प्रवाशाचे दागिने, मोबाइल चोरणारे गुजरातेत जेरबंद

चोरटे जेरबंद,www.pudhari.news

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

औरंगाबादहून खासगी बसने सुरतला जात असलेल्या प्रवाशाचे दोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि मोबाइल प्रवासात लंपास करणाऱ्या दोन चोरट्यांना दिंडोरी पोलिसांनी गुजरातमध्ये मुद्देमालासह अटक केली.

सुनीता संतोष गुप्ता (45, रा. अंकलेश्वर, गुजरात) या औरंगाबाद येथुन मुशाफीर कंपनीच्या बसमधून सूरतला चालल्या होत्या. प्रवासात चोरट्यांनी त्यांचे दोन लाखांचे दागिने, रोकड तसेच मोबाइल चोरला. याबाबत दिंडोरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार हे चोरीस गेलेला मोबाइल ट्रॅक करत होते. हा मोबाइल सुरू झाल्यावर तांत्रिक विश्लेषण शाखेमार्फत शोध घेऊन तो मोबाइल गुजरात राज्यात नवसारी जिल्ह्यातील चिखली या ठिकाणी सुरू असल्याची माहिती मिळाली. तेथे जाऊन दिंडोरी पोलिस पथकाने मोबाइलचा शोध घेतला असता, मोबाइल वापरणाऱ्याने हा मोबाइल आपण एकाकडून विकत घेतल्याचे सांगितले. त्याने दिलेल्या माहितीआधारे पोलिसांनी समीन सय्यद (२०), मोहम्मद खान (23) चिखली (जि. नवसारी, गुजरात) यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी या दोघांकडून दोन लाख १० हजारांचे दागिने आणि आठ हजारांचा मोबाइल हस्तगत केला.

हेही वाचा : 

The post Nashik Crime : प्रवाशाचे दागिने, मोबाइल चोरणारे गुजरातेत जेरबंद appeared first on पुढारी.