Nashik : हनुमान जन्मस्थळ वाद पुन्हा एकदा उफळला, योगींच्या वक्तव्याचा महंतांकडून निषेध

Yogi Adityanath

नाशिक (पंचवटी ): पुढारी वृत्तसेवा

नाशिक येथील हनुमान जन्मस्थळ वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कर्नाटक येथे प्रचारादरम्यान कर्नाटकातील किष्किंधा हेच हनुमानाचे जन्मस्थान असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा नाशिकमधील साधू-महंतांनी निषेध केला आहे.

मागील वर्षी नाशिकमध्ये शास्त्रार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. किष्किंधाचे दंडास्वामी श्री गोविंदानंद सरस्वती महाराज यांना नाशिकच्या साधू-महंतांना आव्हान दिले होते. वाल्मीकी रामायणाचा दाखला देत हनुमानचे जन्मस्थान अंजनेरी नाही तर किष्किंधा असल्याचा त्यांनी दावा केला होता. तर किष्किंधा येथे भव्य हनुमान मंदिर उभारण्याची घोषणा त्यांनी केली होती. मात्र, या संदर्भात नाशिकच्या साधू-महंतांनी हनुमान जन्मस्थान अंजनेरी असल्याचे दावा केला होता. यावेळी सगळे साधू-महंत आणि पंडित एकवटले आहेत. नाशिकच्या महर्षी पंचायतन पीठामध्ये हनुमान जन्मस्थळाबाबत महाचर्चा झाली होती. त्यावेळी भारतभरातील विद्वान उपस्थित होते आणि सभेच्या अंती ब्रह्मपुराणानुसार व कल्पभेदानुसार अंजनेरी हेच हनुमान जन्मस्थान असल्याचे सर्वांनी मान्य केले होते.                                                                                    

काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातही हनुमानाच्या जन्मस्थानावरून वाद निर्माण झाला होता. हनुमानाचा जन्म तिरुमलाच्या सात टेकड्यांमधील अंजनाद्री पर्वतात झाल्याचा दावा आंध्र प्रदेशमधील तिरुमला तिरुपती देवस्थानने केला होता. तर कर्नाटकने, हनुमानाचे जन्मस्थळ हंपी जवळच्या किष्किंधामधल्या अंजनाद्री येथे झाल्याचा दावा केला होता.

योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नाशिकमधील अनेक साधू- महंतांनी या गोष्टीचा निषेध केला असून, राजकारण करण्यासाठी धार्मिक गोष्टींचा, देवी-देवतांचा आधार व उपयोग करू नये, अशी मागणी करत योगींच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. यामुळे पुन्हा एकदा धार्मिक वाद उफळल्याचे दिसून येत आहे

नाशिकची आख्यायिका

हनुमानाचा जन्म नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या अंजनेरी डोंगरावर झाला. अंजनेरी हे नाव हनुमानाची आई अंजनीमातेच्या नावावरून पडले. येथे डोंगरावर अंजनी मातेचे आणि हनुमानाचे मंदिरही आहे. राम-सीता-लक्ष्मण नाशिकमधल्या पंचवटीत राहात होते. हनुमानाचा जन्म इथल्या अंजनेरी डोंगरावर झाला आहे, असा दावा नाशिकमधील साधू-महंतांनी केला आहे.

अलीकडे कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री उठून सांगतायं की भीमाशंकर आमच्याकडे, कोणी सांगतायं की पंचवटी आमच्याकडे व आता योगी आदित्यनाथ सांगतायं की, हनुमान जन्मभूमी कर्नाटक आहे. देशात नक्की काय चाललयं काही समजत नाही. कोणीही महाराष्ट्रातील देवस्थाने चोरून नेतायं आणि महाराष्ट्र सरकार व सांस्कृतिकमंत्री यावर मात्र गप्प असतील तर ते योग्य नाही.

– महंत पीठाधीश्वर अनिकेतशास्त्री महाराज, अखिल भारतीय संत समिती, महाराष्ट्र प्रदेशप्रमुख

अंजनेरी हेच हनुमानाचे जन्मस्थान असून, याबाबत कोणीही राजकारण करू नये. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक येथे सभेनिमित्त आले असता त्यांनीदेखील नाशिक हनुमानाची जन्मभूमी असल्याचे सांगितले होते, असे असतानाही जर कोणी राजकीय फायद्यासाठी हा धार्मिक वाद उफाळून काढत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो.

– महंत भक्तचरणदासजी महाराज, पंचमुखी हनुमान मंदिर

हेही वाचा : 

The post Nashik : हनुमान जन्मस्थळ वाद पुन्हा एकदा उफळला, योगींच्या वक्तव्याचा महंतांकडून निषेध appeared first on पुढारी.