Nashik Crime : मिठाई दुकानातील ३५ लाखांची रोकड चोरणारा गजाआड

नाशिक क्राईम,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गंगापूर रोडवरील सागर स्वीट्स दुकानात घरफोडी करून ३५ लाख रुपयांची रोकड चोरणाऱ्या चोरट्यांचा शोध गंगापूर व गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने घेतला आहे. दोन्ही संशयितांपैकी एकास अटक केली असून, त्याच्याकडून २२ लाख ७० हजार रुपयांची रोकड हस्तगत केली असून, दुसऱ्यास ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपआयुक्त प्रशांत बच्छाव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चोरट्यांनी १८ डिसेंबरला मध्यरात्री सागर स्वीट्स दुकानाच्या गॅलरीवाटे कार्यालयात शिरून तेथून रोकड लंपास केली होती. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात सुरुवातीला घरफोडीत २० लाख रुपयांची चोरी झाल्याचे रतन चौधरी यांनी सांगितले. मात्र त्यांच्या भावाचीही १५ लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे चोरट्यांनी घरफोडी करून ३५ लाख रुपये चोरल्याचे स्पष्ट झाले. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी तपासासाठी गंगापूर पोलिसांसह गुन्हे शाखेस सूचना केल्या होत्या. त्यानुसार गंगापूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख, गुन्हे शाखा युनिट एकचे विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दुकानासह परिसरातील व रेल्वेस्थानकावरील सीसीटीव्ही तपासले. त्याचप्रमाणे दुकानातील आजी-माजी कर्मचाऱ्यांची माहिती घेतली. त्यात दुकानातील माजी कर्मचारी विवेककुमार उर्फ अंजनी रामेश्वरप्रसाद याने दुसऱ्या साथीदारासह मिळून घरफोडी केल्याचे समेार आले. त्यामुळे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, अंमलदार योगेश चव्हाण, रवींद्र बागूल, येवाजी महाले, संदीप भांड, विशाल देवरे आदींच्या पथकाने उत्तर प्रदेशमधील बाराबंकी येथे पाठवण्यात आले. पथकाने तपास करून संशयित अखिलेशकुमार मणिराम (२५, रा. जि. बाराबंकी, राज्य उत्तर प्रदेश) यास पकडले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने विवेककुमारसोबत घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी अखिलेशकडून २२ लाख ७० हजार रुपयांची रोकड हस्तगत केली. त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, विवेककुमारने घरफोडी करून उत्तर प्रदेशला गेल्यानंतर स्वत:ला अवैध शस्त्र बागळल्या प्रकरणात सफदरगंज पोलिस ठाण्यात अटक करून घेतली होती. जेणेकरून गुन्हा घडला त्यावेळी अटकेत असल्याचा बेत त्याने आखला होता. मात्र त्याचा हा बेत फसला असून, नाशिक पोलिस न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून त्याचा ताबा घेणार आहेत.

अशी केली घरफोडी

विवेककुमारने मालकाचा विश्वास संपादन केला होता. त्याला तेथील आर्थिक व्यवहारांची व इमारतीची पूर्ण माहिती होती. अखिलेशकुमारसोबत मिळून त्याने घरफोडीचा बेत आखला होता. काम सोडल्यानंतर तो पुन्हा नाशिकला आला व अखिलेशकुमारला गॅलरीवाटे कार्यालयात जाण्यास मदत केली. त्यानंतर त्याने घरफोडी करून रोकड चोरली व गावी पसार झाले.

पोलिसांच्या नजरेतून सुटले नाही

संशयित अखिलेशकुमारने गॅलरीतून कार्यालयात शिरताना लाॅक तोडण्यासाठी सुमारे 10 मिनिटे खर्ची घातली. त्यावरूनच चाेरटा नवखा असल्याचे पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने हेरले. त्याचप्रमाणे सीसीटीव्ही फुटेजवरूनही संशयितांची माहिती मिळाल्याने व त्यांचा प्रवास समजल्याने पोलिसांनी त्यांचा माग काढला.

हेही वाचा :

The post Nashik Crime : मिठाई दुकानातील ३५ लाखांची रोकड चोरणारा गजाआड appeared first on पुढारी.