Nashik I रोजगार व उद्योजकता विभाग : ४५०० जागांसाठी संधी

पंडीत दिनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे बुधवारी (दि. २४) पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर सकाळी १० पासून होणाऱ्या या मेळाव्यात युवकांकरिता 4500 हून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध असणार आहेत.

मेळाव्यामध्ये बॉश लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा लि., नाशिक प्लांट, डाटा मॅटिक्स ग्लोबल्स लि, हिंदुस्थान युनिलिव्हर सिन्नर, महिंद्रा ईपीसी, डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिसेस प्रा. लि. आदी नाशिक, पुणे व जळगाव येथील 40 हून अधिक नामांकित कंपन्या व नियोक्ते 4500 हून अधिक रिक्त पद भरतीसाठी मेळाव्यात सहभागी होणार आहेत. यावेळी कंपन्यांचे अधिकारी प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत.

रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरिता इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी आणि या सुवर्णसंधीचा लाभ जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी घ्यावा. याबाबत काही अडचण आल्यास साहाय्यासाठी कार्यालयाच्या 0253-2993321 या क्रमांकावर आणि [email protected] या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन रोजगार व उद्योजकता विभागाचे नाशिक विभाग उपायुक्त सुनील सैंदाणे यांनी केले आहे.

या उमेदवारांना संधी

मेळाव्यात पाचवी पासपासून विविध शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध असतील. त्यामध्ये दहावी, बारावी, कोणत्याही शाखेतील पदवी, पदव्युत्तर पदवी, सर्व आयटीआय, सर्व डिप्लोमा / डिग्री इंजिनिअर, फार्मसी, एम.बी.ए., बीएमस/बीएचएमएस/एमबीबीएस, बीएस्सी/एमएस्सी डीएमएलटी, सीए, ॲग्रिकल्चर, फूड टेक्नॉलॉजी, एमएसडब्ल्यू, मायक्रो बायोलॉजी, मार्केटिंग मॅनेजमेंट आदी शैक्षणिक पात्रताधारकांसाठी पदे असतील.

हेही वाचा:

The post Nashik I रोजगार व उद्योजकता विभाग : ४५०० जागांसाठी संधी appeared first on पुढारी.