Nashik I सराफ बाजारात श्रीरामाच्या सोन्या-चांदीच्या मूर्ती खरेदीसाठी गर्दी

Coins pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अयोध्या येथील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा जल्लोष देशभर बघावयास मिळत असून, श्रीरामाच्या भक्तीत संपूर्ण देशवासी तल्लीन झाले आहेत. प्रत्येकजण हा सोहळा वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरा करण्याच्या प्रयत्नात असून, घरोघरी रामलल्ला विराजमान करण्याचा अनेकांचा मनोदय आहे. त्यासाठी सोन्या-चांदीच्या लोभस मूर्ती तसेच क्वॉइन्स खरेदी करून हा दिवस कायमस्वरूपी स्मरणात ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सराफ बाजारात व्यावसायिकांनी १०० ग्रॅमपासून सोने आणि चांदीच्या मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. या मूर्तींची उंची तीन इंचांपासून पुढे आहे. तसेच १० ते १०० ग्रॅमचे प्रभू श्रीरामाचे रूप असलेले क्वॉइन्सदेखील विक्रीसाठी ठेवले आहेत. एरवी सणासुदीत सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी बघावयास मिळते. मात्र, श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सराफ बाजारालाही झळाळी मिळाल्याने व्यावसायिकांमध्ये देखील समाधानाचे वातावरण बघावयास मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.

वास्तविक, गेल्या दिवाळीनंतर सोने-चांदीचे दर कमी होतील, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर घडलेल्या घडामोडींमुळे दरांमध्ये मोठी वाढ होत गेली. सद्यस्थितीत २४ कॅरेट सोन्याचे दर ६२ हजारांच्या पार आहेत. दुसरीकडे चांदीचे दरही ७३ हजारांपेक्षा अधिक आहेत. त्यामुळे सोने-चांदी खरेदीवर दरवाढीचा काहीसा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे सराफ बाजाराला झळाळी मिळत असल्याचे दिसून येत आहे.

सोने, चांदी दर
शनिवारी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रती१० ग्रॅमसाठी ६२ हजार ८०० रुपये अधिक तीन टक्के जीएसटी इतका नोंदविला गेला. तर १ किलो चांदीचा दर ७३ हजार २०० रुपये अधिक जीएसटी इतका नोंदविला गेला.

ऑनलाइन विक्री
स्थानिक सराफ व्यावसायिकांनी ऑनलाइन पद्धतीने देखील प्रभू श्रीरामाच्या मूर्ती, क्वॉइन्स आणि अयोध्या येथील मंदिराची प्रतिकृती विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याव्यतिरिक्त विविध संकेतस्थळांच्या माध्यमातून देखील सोने-चांदीबरोबरच पंचधातूच्या मूर्तींची विक्री केली जात आहे. राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानाची एकत्र प्रतिकृती असलेल्या मूर्तींना अधिक पसंती दिली जात असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा:

The post Nashik I सराफ बाजारात श्रीरामाच्या सोन्या-चांदीच्या मूर्ती खरेदीसाठी गर्दी appeared first on पुढारी.