Nashik News | सुसाट वाहने चालवणाऱ्यांना साडेसहा लाखांचा दंड; वर्षभरात ३२ हजार चालकांवर कारवाई

speedy vehicles pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सर्वाधिक अपघात व अपघाती मृत्यू हे वेगामुळे होत असल्याचे समोर येते. मात्र, तरीदेखील अनेक वाहनचालक वेगावर नियंत्रण न ठेवता वाहने चालवत असल्याचे वास्तव आहे. अशा चालकांना समज देण्यासाठी पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते. त्यानुसार गत| वर्षभरात वाहतूक शाखेने वेगाने वाहने चालवणाऱ्या सुमारे ३२ हजार चालकांना ६ कोटी ४३ लाख ७० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

प्रशस्त आणि विनाअडथळे रस्ते, अधिक ताकदीची वाहने यामुळे अनेक जण भरधाव वाहने चालवत असतात. मात्र, वेळीच वाहनावर नियंत्रण मिळवता न आल्याने अपघात होतात व त्यात वाहनांचे नुकसान होते तर वाहनस्वारांचा मृत्यू किंवा जखमी होतात. त्यामुळे वाहनांचा वेग मर्यादित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी आवाहन केले जाते. मात्र, तरीदेखील त्याकडे दुर्लक्ष करीत वाहने भरधाव चालवली जातात. वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांनी जानेवारी ते डिसेंबर २०२३ या कालावधीत भरधाव वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई केली. त्यानुसार वाहतूक शाखेच्या इंटरसेप्टर मोबाइल वाहनांनी सुसाट वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांना हेरून ई-चलनद्वारे दंड ठोठावला आहे.

वर्षभरात दीड कोटी रुपयांची वसुली
नाशिक शहर वाहतूक शाखेच्या इंटरसेप्टर मोबाइल वाहनाद्वारे भरधाव वाहने चालवणाऱ्या ३२ हजार दोन वाहनचालकांना दंड ठोठावला. त्यापैकी ७ हजार ८७४ वाहनचालकांकडून १ कोटी ५८ लाख १ हजार रुपयांची वसुली केली. तर २४ हजार १२८ चालकांकडून ४ कोटी ८५ लाख ६९ हजार रुपयांचा दंडवसुली बाकी आहे. या चालकांना ओव्हरस्पीड प्रकरणी प्रत्येकी २ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येतो.

महामार्गावर वेग सुसाट
शहर वाहतूक शाखेतर्फे शहरातून जाणाऱ्या प्रत्येक महामार्गांवर इंटरसेप्टर मोबाइल वाहनामार्फत भरधाव वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांवर सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शहरातील रिंगरोडवरही वेगाची मर्यादा सर्वाधिक असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे. प्रशस्त रस्त्यांमुळे या ठिकाणी भरधाव वाहने चालवण्यावर बहुतांश जणांचा कल असल्याचे जाणवते.

The post Nashik News | सुसाट वाहने चालवणाऱ्यांना साडेसहा लाखांचा दंड; वर्षभरात ३२ हजार चालकांवर कारवाई appeared first on पुढारी.