Nashik Rainfall : यंदा जूनमध्ये सरासरीच्या अवघे १५ टक्के पर्जन्य

पर्जन्य

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जूनचा अखेरचा सप्ताह सुरू असताना जिल्ह्यात मान्सूनने पाठ फिरवली आहे. यंदा जूनमधील सरासरीच्या अवघा १५ टक्के पाऊस  जिल्ह्यात झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीशी तुलना केल्यास तब्बल ५५ टक्के पावसाची तूट आहे.

अल निनोचा प्रभाव आणि अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळाचा फटका यंदा मान्सूनला बसला आहे. जून सरत आला तरी जिल्ह्याला दमदार मान्सूनची प्रतीक्षा आहे. पावसाअभावी जिल्ह्यावरील टंचाईचे ढग कायम आहेत. जिल्ह्याचे जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान १३३.७ मिमी असताना गेल्या २३ दिवसांत अवघा २१ मिमी पाऊस पडला आहे. सरासरीशी तुलना केल्यास त्याचे प्रमाण केवळ १५ टक्के इतकचे आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत जिल्ह्यात ९२.७ मिमी पावसाची नोंद झाली हाेती. त्यामुळे २०२२ च्या तुलनेत यंदाच्या जूनमध्ये तब्बल ५५ टक्के पावसाची जिल्ह्यात तूट आहे. (Nashik Rainfall)

जिल्ह्यातील पावसाचे माहेरघर असणाऱ्या इगतपुरीत जूनमधील सरासरीच्या अवघे पाच टक्के पाऊस झाला असून, त्र्यंबकेश्वरमध्ये १८ टक्के नोंद करण्यात आली आहे. नाशिक तालुक्याच्या घशालाही पावसाअभावी कोरड पडली असून, आतापर्यंत जिल्ह्यात सर्वात नीचांकी ४.७ टक्के पाऊस पडला आहे. त्या तुलनेत कळवणमध्ये तालुक्याच्या सरासरीच्या ४५ टक्के पर्जन्य झाले असून, जिल्ह्यातही हे सर्वाधिक प्रमाण आहे. त्या खालोखाल मालेगावला ३८ व देवळ्यात ३४ टक्के पर्जन्य झाले आहे.

गेल्या पंधरवाड्यापासून सिंधुदर्गात अडकून पडलेल्या मान्सूनचा पुढील प्रवास सुरू झाला आहे. रत्नागिरीसह विदर्भाच्या काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे राज्यात मान्सून सक्रिय झाल्याचे हवामान विभागाकडून घोषित करण्यात आले. मात्र, नाशिकसह राज्यात सर्वदूर पोहोचण्यासाठी त्याला आणखीन काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे जिल्हावासीयांच्या नशिबी तूर्तास पावसासाठी प्रतीक्षाच आली आहे.

जुलैत चांगला पाऊस (Nashik Rainfall) 

राज्यात मुळातच मान्सून यंदा लेटलतीफ आहे. परिणामी पेरण्यांसह सर्वच चक्र कोलमडून पडले आहे. मात्र, जुलै महिन्यात जिल्ह्यासह राज्यात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. हा अंदाज सत्यात उतरल्यास राज्यावरील पाणी संकटाचे ढग दूर सरणार आहेत.

जूनचे आजपर्यंत पर्जन्य (मिमीमध्ये)

मालेगाव ३०.५, बागलाण २५.६, कळवण ४८.२, नांदगाव २१, सुरगाणा २४.१, नाशिक ५.६, दिंडोरी १४.७, इगतपुरी १९.१, पेठ १८.७, निफाड १६.९, सिन्नर १५.९, येवला ९.६, चांदवड ७.४, त्र्यंबकेश्वर ४४.२, देवळा २६.८, एकूण सरासरी २०.८.

हेही वाचा : 

The post Nashik Rainfall : यंदा जूनमध्ये सरासरीच्या अवघे १५ टक्के पर्जन्य appeared first on पुढारी.