Nashik Trimbakeshwar : उटीच्या वारीसाठी चंदन उगाळण्यास प्रारंभ

उटीची वारी,www.pudhari.news

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

येथे रविवारी (दि. 16) होणा-या उटीच्या वारीचे वेध लागले आहेत. मंदिरात चंदन उगाळण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. सोमवारी (दि. १७) संध्याकाळी 5 ला संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तिनाथ महाराजांचा चांदीचा रथ, पालखी व पादुका श्री त्र्यंबकराजाच्या भेटीकरिता जाणार आहे.

चैत्र वद्य तथा वरुथिनी एकादशी ही उटीची वारी म्हणून ओळखली जाते. या यात्रेस पौष महिन्यात होणाऱ्या यात्रोत्सवाच्या खालोखाल महत्त्व आहे. या वारीसाठी ठाणे, नगर यासह संपूर्ण जिल्ह्यातील वारकरी भाविक येतात. भाविकांना उटीवाटप करण्यासाठी तीन स्वतंत्र मंच उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे सुटसुटीत उटीवाटप होणार आहे.

चैत्र वद्य एकादशीनंतर चार दिवसांनी वैशाख महिना एका अर्थाने वैशाख वणवा सुरू होत असतो. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांनी संजीवन समाधी घेतलेली आहे. साक्षात शिवाचा अवतार असलेल्या संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांना वैशाख वणवा सुसह्य व्हावा म्हणून चैत्र वद्य वरुथिनी एकादशीला संपूर्ण समाधीला चंदनाचे लेपन करतात. शीतल चंदनाची उटी लावली जाते. मंदिरात चैत्र पंचमीपासून चंदन उगाळण्यास प्रारंभ होत असतो. सहा दिवसांत साधारणत: दोन पिंप भरतील इतके चंदन उगाळले जाते. एकादशीला दुपारी 2 ला चंदनाचा लेप विधिवत पूजेने व नामसंकीर्तनाच्या गजरात संजीवन समाधीवर लावतात. त्याच दिवशी रात्री 11 नंतर हा चंदनाचा लेप उतरवला जातो आणि तो उपस्थित वारकरी भाविकांना प्रसाद म्हणून वाटतात. वारकरी भाविक दूर दूर अंतरावरून येथे येतात. रात्री 12 ला नाथांच्या समाधीवरील चंदन मस्तकी लावतात आणि कृतार्थ होतात, अशी परंपरा आहे.

असे आहे यावर्षीचे नियोजन

संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नीलेश गाढवे, सचिव ॲड. सोमनाथ घोटेकर, ज्येष्ठ सदस्य नारायण मुठाळ यासह सर्व विश्वस्तांनी उटीच्या वारीची जय्यत तयारी केली आहे. वारीसाठी वॉटरप्रूफ मंडप टाकण्यात येत आहे. वारीनिमित्त सोमवारी (दि. १०) सकाळी ६:३० ते ७:०० या वेळेत विष्णू सहस्रनाम होणार असून दिवसभर पारायण, प्रवचन, हरिपाठ व हरिकीर्तन होणार आहे. येत्या १६ एप्रिलला दुपारी 1 ला श्रींच्या समाधीला चंदनाची उटी लावली जाईल. वडगाव पिंगळा ग्रामस्थांची वारी असून त्यांना समाधीची चंदनाची उटी उतरविण्याचा मान असतो. रात्री ११ नंतर आलेल्या वारकरी भाविकांना चंदनाच्या उटीचा प्रसाद वाटप केला जाणार आहे.

हेही वाचा :

The post Nashik Trimbakeshwar : उटीच्या वारीसाठी चंदन उगाळण्यास प्रारंभ appeared first on पुढारी.