Nashik Weather: वेशीवरील मान्सूनने घेतला दोघांचा जीव

नाशिक टीम पुढारी : पुढारी वृत्तसेवा  – नाशिक शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत रविवारी (दि.९) वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व धुवाधार पावसाने झोडपले. देवळा तालुक्यासह नांदगावमध्ये सायंकाळाच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली, तर देवळा तालुक्यात वीज पडल्याने युवकाचा एकाचा मृत्यू झाला असून, इतर दोघे जखमी आहेत. हवामान विभागाने मुंबई आणि ठाणे परिसरात मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली. पुढील २४ ते ३६ तासांत मान्सून नाशिक जिल्ह्यात डेरेदाखल होईल, असा अंदाज आहे.

उमराणे : वादळी पावसात ट्रॅक्टरवर झाड कोसळल्याने झालेले नुकसान. (छाया: सोमनाथ जगताप)

तळकोकण व पश्चिम महाराष्ट्रात हजेरी लावणाऱ्या पावसाने दोन दिवस अगोदरच मुंबई परिसरात वर्दी दिली. सुटीच्या दिवशी मुंबई-ठाण्यासह अन्य भागांत त्याने हजेरी लावली. पावसाचे हे आगमन नाशिकककरांच्या दृष्टीनेही आनंदाची बाब आहे. नाशिकच्या वेशीवर मान्सून दाखल होत असताना जिल्ह्याच्या काही भागांत वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व सरी बरसल्या. देवळा तालुक्यात तिसगावला आकाश शरद देवरे (२०) तसेच वासरावर वीज कोसळली. यामध्ये वासरू जागीच गतप्राण झाले. उपचारादरम्यान आकाशचा मृत्यू झाला. उमराणे येथे शेड कोसळल्याने देवीदास भाऊराव आहेर (४०) यांचा मृत्यू झाला. गायत्री सूरज देवरे (२२) व अभय अजय देवरे (साडेतीन वर्षे) हे दोघे जखमी झाले. याच भागात ८ ते ९ शेडव ९ ते १० घरांचे अंशतः नुकसान झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. नांदूरमध्यमेश्वर (ता. निफाड) येथील गट नंबर ६८ मध्ये नरेंद्र शिंदे यांची गायीच्या अंगावर वीज कोसळून ती गतप्राण झाली. जिल्ह्यात १ जूनपासून ते आजपर्यंत सरासरी ११ मिमी पर्जन्याची नोंद करण्यात आली आहे. येवला तालुक्यातील रंडाळा परिसरात झालेल्या वादळी पावसात सीताराम वाल्मीक आहेर यांची म्हैस वीज पडून मृत झाली.

निफाड तालुक्यात वीज पडल्याने तीन गाईंचा मृत्यू

निफाड परिसरात रविवार सायंकाळी चारच्या सुमारास आलेल्या वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. नांदुर्डी, नांदूरमध्यमेश्वर आणि डोंगरगाव अशा तीन ठिकाणी वीज कोसळून तीन गाईंचा मृत्यू झाल्याची माहिती तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी दिली आहे. रात्री आठनंतरही संपूर्ण परिसरात मुसळधार पाऊस सुरूच होता.

मनमाड, येवल्यात जोरदार

मनमाड तसेच येवला परिसरात सायंकाळी वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. रेल्वेस्थानकावरील पत्र्यांना गळती लागल्याने प्रवाशांचे हाल झाले.

हेही वाचा: