World Cancer Day : नाशिक शहरात महिलांमध्ये कर्करोगाचं प्रमाण ‘इतकं’

स्तनाचा कर्करोग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
धूम्रपान, मद्यपान एवढेच नाहीतर मांसाहर करत नाहीत, अशा महिलांमध्येसुद्धा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरात महिलांमध्ये ३० टक्के स्तनाचा, तर त्यापाठोपाठ २७ टक्के गर्भाशयाचा कर्करोग होत असल्याची धक्कादायक टक्केवारी समोर आलेली असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. (World Cancer Day)

जीवनपद्धती बदलल्यामुळे कोणत्याही आजाराची लागण होणे आता नवीन राहिले नाही. त्यामुळे नियमित तपासणी आणि आरोग्यदायी जीवनशैली जगणे माणसाच्या हातात आहे. ज्या प्रकारचे चित्र सिनेमांमध्ये कर्करोगासंबंधी रंगवून दाखवले जाते, तशी परिस्थिती आता राहिली नाही. आधुनिक तंत्रज्ञानामुळे उपचारपद्धती सुलभ झाली आहे. रोबोटिक सर्जरीमुळे शस्त्रक्रिया सोपी झाली आहे. गर्भाशयाची शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्ण ४८ तासांनंतर घरी जाऊ शकतो. शिवाय त्याचे रिझल्ट चांगले असून, रुग्ण लवकर बरा होतो. त्याच्या वेदना कमी होऊन कर्करोगातून मुक्त होतो. गर्भाशयाच्या कर्करोगात जोपर्यंत तो ओटीपोटात पसरत नाही तोपर्यंत त्याची लक्षणे जाणवत नाहीत. जेवताना पोट भरल्यासारखे वाटणे, वजन कमी होणे, पोट फुगल्यासारखे वाटणे, अनियमित मासिक पाळी असे लक्षण आढळून आल्यास तपासणी करून घेणे गरजेचे असते. कर्करोग शरीराबरोबर मानसिकतेवर तेवढाच परिणाम करतो. त्यामुळे घाबरून न जाता योग्य उपचारपद्धतीने कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो.

World Cancer Day : सर्वसामान्य महिलांमध्ये जनजागृतीची गरज

शरीरात काही बदल झाल्यास त्याची चाहूल कळते. त्याकडे दुर्लक्ष न करता कोणताही गैरसमज न बाळगता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्तनाचा कर्करोग झाल्यावर स्तन काढून घेतले जाईल भविष्यात कसे होईल? या भीतीपोटी अनेक महिला घरगुती उपचारांना महत्त्व देतात आणि तोपर्यंत उशीर झालेला असतो.

World Cancer Day : स्वतपासणी करून बघा..

आरशात उभे राहून स्तनाचा आकार बदलला आहे का? तपासून बघा. काखेत सतत वेदना होत असतील, स्तनातून स्त्राव होत असेल, स्तनाला लालसरपणा, पुरळ आली असेल किंवा कडक झाल्यासारखे लक्षण जाणवत असतील तर वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. मॅमोग्राफीद्वारे कर्करोगाचे निदान केले जाते.

समाजात कर्करोगाबाबत अजूनही जनजागृती होणे गरजेचे आहे. जितक्या लवकर आजाराचे निदान कळते तेवढ्या लवकर उपचार करून रुग्ण १०० टक्के बरा होण्याची शक्यता वाढते. वयाच्या चाळिशीनंतर प्रत्येक महिलेने स्तनाची तपासणी गरजेचे आहे परंतु घरात कुणाला कर्करोग झाला असेल तर वयाच्या ३५ नंतर नियमित तपासणी करणे गरजेचे आहे.
– डॉ. राज नगरकर, कर्करोगतज्ज्ञ,

हेही वाचा :

The post World Cancer Day : नाशिक शहरात महिलांमध्ये कर्करोगाचं प्रमाण 'इतकं' appeared first on पुढारी.