नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या आठवड्यात जिल्हा निवडणूक शाखेने प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्याचे लिंगगुणोत्तराच्या प्रमाणात वाढ झाली आहे. दर हजार पुरुषांमागे जिल्ह्यात ९१९ महिला मतदार आहेत. त्याचवेळी नाशिक पश्चिम मतदारसंघात हजार पुरुषांमागे अवघ्या ८५८ महिला मतदार असल्याचे धक्कादायक सत्य समोर आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक शाखेने पंधराही विधानसभा मतदारसंघाच्या मतदारयाद्या तयार केल्या आहेत. यंदा याद्या तयार करताना प्रशासनाने नवयुवक तसेच महिला मतदारांचा टक्का वाढविण्यावर भर दिला. अंतिम याद्यांच्या प्रसिद्धीनंतर या प्रयत्नांना चांगले यश आल्याचे सकारात्मक चित्र पाहायला मिळाले. जिल्ह्याचा लिंगगुणोत्तराचे प्रमाणात सहाने वाढ होत ९१३ वरून ९१९ वर पोहोचले आहे. म्हणजे दर हजार पुरुष मतदारांमागे आता ९१९ महिला मतदार या त्यांच्या मतदानाचा हक्क लोकसभा निवडणुकीत बजावणार आहे.
जिल्ह्यात कळवण मतदारसंघात लिंगगुणोत्तराचे प्रमाण सर्वाधिक आहे. तेथे हजार पुरुषांमागे ९६५ महिला मतदार आहेत. त्याखालोखाल नाशिक मध्यला हेच प्रमाण ९६० इतके आहे. इगतपुरीत ९४९ व दिंडोरीत ९४४ इतके प्रमाण आहे. मात्र, त्या तुलनेत जिल्ह्यातील सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या नाशिक पश्चिममध्ये महिला मतदारांचे प्रमाण कमी आहे. या मतदारसंघात हजार पुुरुषांमागे केवळ ८५८ महिला मतदार आहेत. क्वालिटी सिटीसाठी निवड झालेल्या नाशिक शहराच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब म्हणावी लागेल.
दर हजारांमागे महिला मतदार
नांदगाव ९०४, मालेगाव मध्य ९१९, मालेगाव बाह्य ९०१, बागलाण ९०५, कळवण ९६५, चांदवड ९०८, येवला ९०७, सिन्नर ९०४, निफाड ९४२, दिंडाेरी ९४४, नाशिक पूर्व ९३४, नाशिक मध्य ९६०, नाशिक पश्चिम ८५८, देवळाली ९२१, इगतपुरी ९४९.
हेही वाचा:
- Market Update : नव्या हंगामातील लसूण बाजारात
- Pariksha Pe Charcha 2024 : Reels पाहू नका…! पंतप्रधान मोदींची विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’, दिले ‘हे’ १० कानमंत्र
- “नितीश कुमारांनीच भाजपविरोधात..” : शिवसेना ठाकरे गटाचा हल्लाबोल
The post अंतिम मतदार यादीतून सत्य समोर; जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर प्रमाण ९१९ appeared first on पुढारी.