नाशिक सिडको: पुढारी वृत्तसेवा – काही तरी करून तुम्हीच आमच्या घराची लाईट बंद केली. या कारणावरुन कुरापत काढून शेजारी राहणाऱ्या ६ ते ७ जणांच्या टोळक्याने कुटुंबातील ४ जणांना धारदार शस्त्राने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी संतोष रुंजा बोडके (रा. ढोकणे मळा, फडोळा मळा, अंबड ) हे शेती करतात. दरम्यान, काल रात्री ८ वाजेच्या सुमारास फिर्यादी बोडके हे आई, वडील, पत्नी, भाऊ, भाऊजय व मुलांसह घरी होते. त्यावेळी परिसरातील लाईट गेली होती. मात्र बोडके यांच्या घरात चार्जिंगचा बल्ब असल्याने त्यांच्या घरातून उजेड येत होता. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांच्या शेजारी राहणारा संशयित सुनिल तुकाराम चव्हाण हा दारुच्या नशेत बोडके यांच्या घरासमोर आला.
त्यावरुन कुरापत काढून आमच्या घरातली लाईट गेली असून, तुमच्या घरातली लाईट कशी चालू आहे, तुम्हीच काही तरी करुन आमचे लाईट बंद पाडली असे म्हणत वाद घातला. तसेच हा वाद वाढत गेला. त्यावेळी संशयित चव्हाण याची दोन मुले रणजित व पंकज, पुतण्या निखिल हिराचंद चव्हाण, गोकुळ संजय चव्हाण हे सुद्धा त्या ठिकाणी आले. त्यांनी फिर्यादी संतोष बोडके यांच्यासह कुटुंबाला शिवीगाळ सुरु केली. तसेच गोकुळ चव्हाण याने फोन करुन आणखी काही जणांना बोलावून घेतले. त्यानंतर रिक्षा व एका मोटारसायलवरुन ५ ते ६ जण हातात लाकडी दांडके, धारदार शस्त्रे घेऊन आले. त्यांनी फिर्यादी यांच्या अंगावर धावून जात त्यांना मारहाण केली. फिर्यादी बोडके यांना वाचवण्यासाठी त्यांची आई कोंड्याबाई, वडील रुंजा, भाऊ नारायण, मुलगा आदित्य व शरद तसेच पत्नी व भाऊ जय हे मदतीला धावून आले. मात्र, या टोळक्यातील एका काळ्या रंगाचा शर्ट घातलेल्या व्यक्तीने त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने पाठिवर जबर मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या वडिलांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने मारुन जबर दुखापत केली. तर घरातील इतर सदस्यांनाही लाकडी दांड्याने मारहाण करुन धारदार शस्त्राने जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
सायरनचा आवाज ऐकताच ठोकली धूम
दरम्यान, ही हाणामारी सुरू असताना परिसरातील पोलिसांच्या वाहनाच्या सायरनचा आवाज आल्याने संशयितांनी तेथून धुम ठोकली. या घटनेतील जखमी फिर्यादी संतोष बोडके यांचे वडील रुंजा पंजा बोडके (७०) हे गंभीर जखमी झाले. यांच्यासह आई, वडील व कुटुंबातील इतर जखमी सदस्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बोडके यांच्या फिर्यादीनुसार अंबड पोलीस ठाण्यात टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
हेही वाचा :
- Dhule News : लोकसभा निवडणुकांसाठी विधानसभास्तरीय मास्टर ट्रेनरचे प्रशिक्षण
- Nashik News : केटी वेअर कामामुळे सिंचन, पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार : आ. डॉ. आहेर
- 30 कोटींची स्वच्छ हवा ! तरीदेखील शहरातील धूळ काही हटेना
The post आमची लाईट गेली, तुमची कशी काय चालू? कुटुंबास मारहाण appeared first on पुढारी.