आयपीएल सामन्यावर बेटींग लावणाऱ्यास नाशिक पोलिसांकडून बेड्या

आयपीएल सामना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- ‘आयपीएल’मधील कोलकाता विरुद्ध दिल्ली या सामन्यामध्ये बेटींग लावणाऱ्या संशयितास विशेष पथकाने पकडले आहे. महेंद्र वैष्णव (३४, रा. तारवाला नगर) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कृषीनगर जॉगिंग ट्रॅकसमोर आयपीएल सामन्यांवर बेटींग सुरू असल्याची माहिती विशेष पथकातील पोलिस नाईक दत्तात्रय चकोर यांना मिळाली. त्यानुसार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला. बुधवारी (दि.३) रात्री पोलिसांनी संशयित महेंद्र यास बेटींग लावताना रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून मोबाइल, रोकड व कार असा १६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयित महेंद्र हा मोबाइलवर आयपीएल सामना पाहून पैजा लावत असल्याचे उघड झाले. त्यास गंगापूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत नागरे, उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, श्रेणी उपनिरीक्षक दिलीप सगळे, दिलीप भोई, चकोर आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

ऑनलाइन जुगार

आयपीएल सामन्यांमध्ये बेटींग लावणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक जण मोबाइलवरूनच बेटींग लावत असल्याने त्यांना शोधण्यात अडचणी येत आहेत. त्याचप्रमाणे बेटींग लावणारे फक्त ओळखींच्यांसोबतच संपर्कात राहतात. नव्या व्यक्तीवर ते सहजासहजी विश्वास ठेवत नसल्याने बेटींग लावणाऱ्यांची ओळख गुप्त राहण्यास मदत होत आहे.

हेही वाचा –

The post आयपीएल सामन्यावर बेटींग लावणाऱ्यास नाशिक पोलिसांकडून बेड्या appeared first on पुढारी.