इगतपुरीत ३१६ हेक्टरवर उभी राहणार औद्योगिक वसाहत 

औद्योगिक वसाहत,www.pudhari.news

नाशिक : सतीश डोंगरे

नाशिक जिल्ह्याकडे नव्या उद्योगांचा ओढा आणि स्थानिक उद्योगांची विस्तारीकरणाची भूमिका लक्षात घेता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने इगतपुरी तालुक्यात नवी औद्योगिक वसाहत उभारण्याच्या प्रक्रियेला गती दिली आहे. तालुक्यातील आडवण येथे २६२.९७, तर पाटदेवी येथे ५३ अशी एकूण ३१५.९७ हेक्टर जमीन संपादन केली जात आहे. ही औद्योगिक वसाहत ‘डी झोन’मध्ये उभारली जाणार असल्याने नव्या उद्योगांना अनेक लाभ प्राप्त होणार आहेत. (MIDC News)

सध्या जिल्ह्यात १४ औद्योगिक वसाहती असून, त्यापैकी अंबड आणि सातपूर या दोन प्रमुख वसाहती नाशिक शहरात आहेत. मात्र, वसाहतींमध्ये उद्योगांसाठीच्या जागेची चणचण लक्षात घेता, जिल्ह्यातील विविध भागांमध्ये नवी औद्योगिक वसाहत उभी करण्यासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू आहे. यापूर्वीच दिंडोरी तालुक्यातील जांबूटके येथे ३१.५१ हेक्टर, सिन्नर तालुक्यातील मापारवाडी येथे २३०.६७ हेक्टर, नाशिक, राजूरबहुला येथे १४४.४३ हेक्टर, मनमाड येथे २६८.८७ हेक्टर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. आता यात इगतपुरी तालुक्याचाही समावेश करण्यात आला असून, तालुक्यातील घोटी, आडवण येथे २६२.९७ हेक्टर तर पाटदेवी येथे ५३ हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले जात आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील गोंदे, वाडीवऱ्हे या भागात खासगी जमिनीवर उद्योग उभे आहेत. मात्र, या ठिकाणी सुविधांची वानवा असल्याने, येथील उद्योजकांकडून सातत्याने एमआयडीसी प्रशासनाकडे सुविधांसाठी पाठपुरावा केला जात आहे. वास्तविक, येथील उद्योजकांकडून संबंधित ग्रामपंचायतींना लाखो रुपये कर भरला जातो. मात्र, अशातही मूलभूत सुविधा दिल्या जात नसल्याने उद्योजक त्रस्त आहेत. दुसरीकडे एमआयडीसीदेखील हतबल असल्याने, या नव्या औद्योगिक वसाहतीचा पर्याय उपलब्ध करून दिला जात असल्याची चर्चा आहे. दरम्यान, लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (MIDC News)

मुंबई-पुण्यातील उद्योगांसाठी सर्वोत्तम पर्याय

मुंबई, पुणे, नाशिक या सुवर्णत्रिकोणात नाशिक हे झपाट्याने विकसित होणारे शहर म्हणून बघितले जाते. उद्योग विस्तारातदेखील नाशिक आघाडीवर असल्याने, मुंबई-पुण्यातील मोठे उद्योग विस्तारासाठी नाशिकला प्राधान्य देत आहेत. रिलायन्स उद्योग समूहाने मुंबईतील आपल्या रिलायन्स लाइफ सायन्सेस या उपकंपनीच्या विस्तारासाठी नाशिकला प्राधान्य दिले. दिंडोरी तालुक्यातील अक्राळे येथे तब्बल ४,२०० कोटींची गुंतवणूक केली. इगतपुरी येथील औद्योगिक वसाहत दळणवळणाच्या दृष्टीने मुंबई-पुण्यातील उद्योगांसाठी सर्वाधिक सोयीस्कर ठरू शकणार आहे.

५० शेतकऱ्यांकडून हरकती

आडवण आणि पाटदेवी येथे भूसंपादनाची प्रक्रिया तेजीत सुरू असतानाच ५० शेतकऱ्यांनी यास हरकती घेतल्या आहेत. त्यांना इगतपुरी, त्र्यंबकेश्वर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांमार्फत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दरम्यान, ही नियमित प्रक्रिया असून, जमीन संपादनास फारसा अडथळा येणार नसल्याचे यावेळी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सुमारे अडीच हजार एकर भूसंपादन

जांबूटके, दिंडोरी – ३१.५१ हेक्टर

मापारवाडी, सिन्नर – २३०.६७ हेक्टर

राजूरबहुला, नाशिक – १४४.४३ हेक्टर

घोटी (आडवण) – २६२.९७ हेक्टर

पाटदेवी – ५३ हेक्टर

मनमाड – २६८.८७ हेक्टर

एकूण – ९९१.४५ हेक्टर

हेही वाचा :

The post इगतपुरीत ३१६ हेक्टरवर उभी राहणार औद्योगिक वसाहत  appeared first on पुढारी.