नाशिक : पुढारी वृत्तसेवा – नाशिक लाेकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज त्र्यंबकेश्वर येथील मतदान केंद्रामध्ये ईव्हीएमला हार घातला. त्यामुळे आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी शांतिगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. २०) शांततेत मतदानाला प्रारंभ झाला. अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी त्र्यंबकेश्वर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये सकाळी सात वाजता मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर शांतीगिरी महाराज यांनी आपल्या गळ्यातील हार थेट ईव्हीएमलाच घातला. सदरच्या प्रकारानंतर केंद्रावरील कर्मचारी काहीसे गोंधळात पडले. प्रशासनाच्या तपासणीस हा प्रकार म्हणजे आदर्श आचारसंहितेचा भंग असल्याचे प्राथमिक निदर्शनास आले. त्यामुळे त्र्यंबकेश्वर येथील पाेलिस ठाण्यात शांतिगिरी महाराजांवर निवडणुक आयोगाच्या आदर्श नियमावलीचा भंग म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनुयायी घेतले ताब्यात
शांतीगिरी महाराज यांच्यावर त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात आचारसंहितेचा गुन्हा दाखल झाला असताना नाशिकमध्ये त्यांच्या अनुयायांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मतदान केंद्राबाहेर भगवे वस्त्र परिधान करताना या वस्त्रांवर जय बाबाजी तसेच उमेदवाराचे छायाचित्र व चिन्ह असल्याची तक्रार प्राप्त झाली. तसेच सदर अनुयायांकडून उमेदवाराचे छायाचित्र असलेल्या मतदान चिठ्यादेखील वितरीत केले जात असल्याचे तक्रारीत म्हटले होते. अंबड पोलिसांनी तक्रारीची दखल घेत १० ते १२ अनुयायांना ताब्यात घेतले. सदर प्रकारानंतर शांतिगिरी महाराज यांनी थेट अंबड पोलिस ठाणे गाठत अनुयायांना सोडण्याची मागणी कली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याशीदेखील त्यांनी चर्चा केली.
ईव्हीएममध्ये देव : शांतिगिरी महाराज
त्र्यंबकेश्वर येथील घडलेल्या प्रकारानंतर शांतिगिरी महाराज यांनी प्रतिक्रिया देताना आम्ही सर्व गोष्टीं मध्ये देव बघतो. ईव्हीएममध्येही देव असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मतदान केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी मतदान केंद्राबाहेर बेलफुलाने पूजा करुन वंदन केले. विरोधकांनी हाच मुद्दा उचलत सदर प्रकार आदर्श आचारसंहितेचा उल्लंघन असल्याचा आरोप केला. पण मतदान केंद्र हे पवित्र ठिकाण असून आम्ही शुद्ध भावनेतून पूजा केल्याचे शांतिगिरी महाराज यांनर सांगितले.
हेही वाचा: