उत्तर मध्य मुंबईतील भाजपचे धक्कातंत्र पाहून नाशिकमध्ये वाढली धाकधूक

लोकसभा निवडणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-  उत्तर मध्य मुंबईत उमेदवारीवरून निर्माण झालेला पेच भाजपने धक्कातंत्राचा अवलंब करीत सोडविला. मात्र, यामुळे नाशिकमध्ये धाकधूक वाढली असून, असा प्रयोग नाशिकमध्येही शक्य असल्याचे बोलले जात असल्याने महायुतीत विशेषत: शिवसेनेत धाकधूक वाढली आहे. दरम्यान, उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या तिन्ही पक्षाच्या इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले आहेत.

उत्तर-मध्य मुंबईत भाजपने दोन वेळा लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट करीत, प्रख्यात कायदेपंडित उज्ज्वल निकम यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात कोण उमेदवार असेल? या चर्चांना आता ब्रेक मिळाला आहे. मात्र, नाशिकमध्ये हा प्रश्न कायम असल्याने, याठिकाणी महायुतीची विशेषत: भाजपची काय रणनीती असेल यावर आता चर्चा रंगत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार हेमंत गोडसे शिवसेना शिंदे गटाचे आहेत. उमेदवारीसाठी त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपने या मतदारसंघावर दावा केल्याने, उमेदवारीचा तिढा वाढला आहे. उमेदवारी कोणास मिळणार त्यापेक्षा महायुतीत मतदारसंघ कोणत्या पक्षाला सोडला जाणार यावरच चर्चा अडली असल्याची माहिती समोर येत आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपने शिवसेना शिंदे गटाला ‘नाशिक-ठाणे एक्स्चेंज आॅफर’ दिल्याची माहिती समोर आली होती. दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाने सातारा भाजपला दिल्यास, नाशिकची जागा आम्ही लढवू, अशी भूमिका घेतली होती. एकंदरीत महायुतीतील तिन्ही पक्ष नाशिकच्या जागेसाठी आग्रही असल्याने उमेदवारीचा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, उत्तर मध्य मुंबईत भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांना डच्चू देत अॅड. उज्ज्वल निकम यांना मैदानात उतरविल्याने, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे नाशिकमध्येही भाजप असाच प्रयोग करण्याच्या विचाराधीन असल्याने, विद्यमान खासदारांसह इच्छुकांमध्ये प्रचंड धाकधूक वाढल्याची चर्चा आहे.

मास्टरस्ट्रोकचाच होईल फायदा

उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, मतदानासाठी जेमतेम दिवस उरले आहेत. अशात २० लाख मतदारसंख्या असलेल्या नाशिक मतदारसंघात प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचणे महायुतीच्या उमेदवारास अवघड होणार आहे. प्रचाराला कमी कालावधी मिळाल्याचे कारण समोर करीत, जिल्ह्यातील हेवीवेट नेते मंत्री छगन भुजबळ यांनी उमेदवारीच्या रेसमधून सपशेल माघार घेतली. सेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनीदेखील हेच कारण पुढे केले. अशात नाशिक मतदारसंघातील आव्हान कायम ठेवण्यासाठी महायुतीकडून विशेषत: भाजपकडून मास्टरस्ट्रोक खेळला जाण्याची शक्यता आहे. तसे केल्यास फायदा होईल, अशी वरिष्ठांची धारणा असल्याची माहिती समोर येत आहे.

नाशिकची जागा भाजपला?

नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीतील तिन्ही पक्षांची ताकद लक्षात घेता अन् प्रचाराचा कालावधी विचारात घेता ही जागा भाजप पदरात पाडून घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे. या मतदारसंघात भाजपचे तीन आमदार असून, नाशिक महापालिकेसह त्र्यंबकेश्वर नगर परिषदेत भाजपची सत्ता होती. याशिवाय भाजपने गावपातळीवर संघटन निर्माण केल्याने, या जागेवर भाजपकडून प्रबळ दावा केला जात आहे. दुसरीकडे सेना अन् राष्ट्रवादी अजित पवार गटही दावा करीत असला तरी, मतदारसंघातील बळ दाखविण्याचे सूत्र ते कसे जुळवून आणणार यावर बरेच अवलंबून असेल.

हेही वाचा –