उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदी, अमित शाहांवर घणाघात

Uddav Thackeray www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेले. शेतकऱ्यांच्या बी-बियाण्यांवर भरमसाठ जीएसटी लावला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वेठीस धरले. जी शिवसेना संकट काळात तुमच्या पाठीशी होती, तिच्याच पाठीत खंजीर खुपसला. नोकऱ्या, शेत मालाला हमीभाव, पीकवीमा, आरोग्याच्या सुविधा न देता, महाराष्ट्राला ओरबाडण्याचे काम नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याकडून केले जात आहे. त्यामुळे या दोघा लुटारूंना महाराष्ट्रातून हाकलून लावा, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर घणाघात केला.

महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ हुतात्मा अंनत कान्हेरे मैदान येथे आयोजित केलेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधला. ठाकरे म्हणाले, ‘पंतप्रधान मोदी भ्रर्मिष्ठ झाल्यासारखे बोलत आहेत. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची जबाबदारी पूत्र या नात्याने माझ्यावर सोपविली. मात्र, हे पावटे शिवसेनेला नकली म्हणतात. बाळासाहेबांचा मी नकली संतान असल्याचे म्हणतात. मात्र, तुम्ही जरी चोराच्या हातात धनुष्यबाण दिला असला तरी, मी मशाल पेटवली आहे. देशातील फौज तुमच्याकडे आहे. मात्र, तरीदेखील तुम्ही उद्धव ठाकरेंना घाबरत आहात. तुमच्या कित्येक पिढ्यांना गद्दारांना मांडीवर घ्यावे लागेल. ७० हजार कोटींचा जर तुम्ही उपमुख्यमंत्री दिला तर मुख्यमंत्री किती कोटींचा असेल, असा सवाल उपस्थित करीत, मुख्यमंत्री शिंदेवर त्यांनी निशाणा साधला.

ते म्हणाले, २०१४, २०१९ मध्ये आम्ही तुमच्यासोबत आल्याची चुक होती. त्यासाठी मी महाराष्ट्राची माफी मागत असल्याचेही ठाकरे म्हणाले. तसेच ४ जूनपासून नरेंद्र मोदी पंतप्रधान नसतील. देशात इंडिया आघाडीचे सरकार आल्यास, शेतकरी हिताचे अगोदर निर्णय घेतले जातील. शेतीच्या साहित्यावर लादलेला जीएसटी रद्द केला जाणार असल्याचेही आश्वासनही ठाकरे यांनी दिले.

यावेळी खासदार संजय राऊत, आमदार हिरामण खोसकर, नरेंद्र दराडे, माजी आमदार वसंत गिते, नितीन भोसले, योगेश घोलप, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदे, काँग्रेसच्या हेमलता पाटील, डी. एल. कराड, विनायक पांडे यासह महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

३७० अदानींसाठीच हटवले
अमित शाह म्हणतात आम्ही कलम ३७० कलम रद्द केले. याबद्दल उद्धव ठाकरेंनी बोलावे. आम्ही तुम्हाला ३७० कलम रद्द करायला, जाहीर पाठिंबा दिला. पण एका सभेत ॲड. असीम सरोदे यांनी जी माहिती दिली ती धक्कादायक आहे. ते म्हणाले, मोदी सरकारने कलम ३७० हटवलेच नाही. ‘३७० ब’ हे पोटकलम निष्प्रभ केले. कलम हटविण्यासाठी जी वैधानिक प्रक्रिया करायला हवी, ती केलीच नाही. कलम निष्प्रभ करण्याचा सगळ्यात मोठा फायदा उद्योजक गौतम अदानींना झाला. अदानींनी त्याठिकाणी सर्वात जास्त जमिनी खरेदी केल्या असून, त्यातून लिथियम काढण्याचा त्यांचा डाव आहे. यातून येणारा पैसा मोदी-शाह यांनाच जाणार असल्याचा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी केला.

नाशिकमधील कांदेला ५० खोके
सोन्यासारखी माझी शिवसेना हिरावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्ही पुन्हा उभे राहिलो. मला माझी चिंता नाही. शिवसेनेला धोकाही नाही. जे उंदीर पळाले, त्यांच्या शेपट्या आम्ही पकडणार आहोत. ज्यांचे व्हिडीओ बाहेर आले, त्यांना जनता धडा शिकवेल. नाशिकमधील कांद्याला ५० खोके दिले, त्यालाही जनता धडा शिकवेल, अशा शब्दात आमदार सुहास कांदे यांच्यावर निशाणा साधला.

महिन्यातील एक दिवस गोदाकाठी – राजाभाऊ वाजे
गेल्या दहा वर्षात जे विकासाचे स्वप्न दाखविले, ते पूर्ण करण्याची माझी जबाबदारी असेल. याव्यतिरिक्त मतदार संघातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी महिन्यातील एक दिवस गोदाकाठी सभा घेवून नागरिकांच्या भावना जाणून घेणार आहे.

हेही वाचा: