काउंटडाउन सुरु; दिंडोरी मतदारसंघात धाकधूक वाढली

दिंडोरी : अशोक निकम

लोकसभा मतदारसंघाची निवडणूक झाल्यानंतर गत 10-12 दिवसांपासून मतमोजणीकडे लक्ष लागलेल्या नागरिकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. मतमोजणी मंगळवारी (दि. 4) होत असल्याने उमेदवारांसह नागरिकांकडून काउंटडाउन सुरू झाले आहे.

दिंडोरी मतदारसंघात महायुतीकडून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, तर महाविकास आघाडीकडून भास्कर भगरे यांच्यात थेट लढत झाली. साडेनऊ तालुक्यांचा असलेला हा मतदारसंघ पेठ, दिंडोरी, कळवण, सुरगाणा या दोन आदिवासीबहुल मतदारसंघांत तर नांदगाव, चांदवड-देवळा, येवला लासलगाव, निफाड या बिगरआदिवासीबहुल मतदारसंघांत विभागलेला आहे, तर मालेगाव तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गटांचाही या मतदारसंघात समावेश आहे. एकूण ४८ जिल्हा परिषद गट या मतदारसंघात आहेत.

नांदगाव विधानसभेत शिवसेना शिंदे गटाचे आ. सुहास कांदे, तर चांदवड- देवळा मतदारसंघात भाजपचे आ. डॉ. राहुल आहेर, निफाड मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ, आ. दिलीप बनकर, दिंडोरी- पेठ मतदारसंघात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, कळवण-सुरगाणा या मतदारसंघात आ. नितीन पवार हे नेतृत्व करत असून, त्यांची मोठी ताकद महायुतीच्या पाठीशी उभी होती, तर महाविकास आघाडीकडे एकही लोकप्रतिनिधी नसल्याने या मतदारसंघातील महाविकास आघाडीची भिस्त निफाडचे माजी आ. अनिल कदम, पिंपळगाव बसवंतचे सरपंच भास्कर बनकर, चांदवडचे माजी आ. शिरीष कोतवाल, दिंडोरीचे श्रीराम शेटे, दत्तात्रय पाटील, शिवसेना संपर्कप्रमुख जयंत दिंडे, सुरगाण्यातून माजी आमदार जे. पी. गावित, शिवसेना जिल्हाप्रमुख कुणाल दराडे, गणेश धात्रक यांच्यावर होती. लोकसभा निवडणुकीत सुरुवातीपासून कांदा निर्यातबंदी हा एकमेव मुद्दा विरोधकांकडून लावून धरण्यात आला होता. त्यात त्यांना शेतकरी कितपत साथ देतात, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शेवटच्या टप्प्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री विजयकुमार गावित, पंकजा मुंडे यांनी, तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे, खा. अमोल कोल्हे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, रोहित पवार, रोहित पाटील, नितेश कराळे आदींच्या सभा झाल्या. या सभांचा कितपत प्रभाव मतदारांवर होतो हे निकालानंतर कळेल.

निवडणुकीत चुरस झाल्याने धाकधूक

डॉ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ महायुतीकडून मोठी यंत्रणा राबविण्यात आली होती. मंत्री गिरीश महाजन स्वत: मतदारसंघात लक्ष घालून सूक्ष्म नियोजन करत होते. शेवटच्या घटकापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडून मतदारांना आपलेसे करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, तर भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ खुद्द शरद पवारांनी नाशिकमध्ये तळ ठोकून डावपेच आखले. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली होती.

हेही वाचा: