कुंभनगरीत युवकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहरात आजपासून सुरू होत असलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवात देशाचा अमृतकाळ ते सुवर्णकाळ या प्रवासाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी युवकांना संबोधित करणार आहेत. नाशिक तीर्थक्षेत्रात जसा कुंभमेळा भरतो तसा युवकांचा महाकुंभ या महोत्सवानिमित्त भरणार असल्याची माहिती केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.

राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या पूर्वसंध्येला पत्रकारांसोबत त्यांनी चर्चा केली. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे, केंद्रीय युवा कल्याण सचिव मीता राजीवलोचन, राज्याचे अतिरिक्त सचिव ओम प्रकाश गुप्ता तसेच क्रीडा आयुक्त सुहास धिवसे आदी उपस्थित होते.

ठाकूर यांनी विकसित भारत 2047 च्या दृष्टीने युवा महोत्सव अतिशय महत्त्वाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३१ ऑक्टोबर रोजी झालेल्या ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियानात देशाचा अमृतकाळ ते सुवर्णकाळाचा प्रवास युवकांनी करावयाचा आहे. त्यासाठी जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याचे विवेचन पंतप्रधान मोदी करणार आहेत. शहराला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. प्रभू रामचंद्रांनी वनवासातील एक मोठा काळ नाशिकमध्ये घालवला होता. सध्या देशभरात राम नाम मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या युवा महोत्सवाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. नाशिकसह देशभरातील 760 जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. देशातील करोडो युवा हा कार्यक्रम बघणार आहेत. येत्या 2036 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक आयोजनाच्या दृष्टीने आतापासूनच प्रयत्न आपण सुरू केले आहेत. भारताला त्याचे आयोजकत्व मिळावे यासाठी सर्व दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे.

मल्लखांब येणार टॉपला

जसे ज्युदो, कराटे या खेळांना जागतिक स्तरावर मोठे नाव मिळाले आहे तसेच मल्लखांब या खेळालाही चांगले दिवस येणार आहेत. हा खेळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून मोठ्या प्रमाणात खेळला जात आहे. या खेळाला ताकद मोठ्या प्रमाणात लागते तसेच बुद्धीही विकसित होते. त्यामुळे या खेळाला जगात आपण टॉपवर पोहोचविणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

The post कुंभनगरीत युवकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार appeared first on पुढारी.