कुंभमेळ्यासाठी आयआयटी खरगपूरचे पथक दाखल

सिंहस्थ कुंभमेळा www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासह नाशिकचा सर्वंकष वाहतूक आराखडा आणि इको सिटी निर्मितीचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यासाठी आयआयटी खरगपूरच्या ५५ तज्ज्ञांचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले आहे. शहराच्या नियोजनबध्द विकासासाठी हा आराखडा उपयुक्त ठरणार असून पथकाच्या अधिकाऱ्यांनी नाशिक महापालिकेच्या नगररचना विभागाचे उपसंचालक हर्षल बाविस्कर यांच्यासमवेत सोमवारी प्राथमिक चर्चा करत कामकाजाला सुरूवात केली. (Nashik Kumbh Mela 2027)

मुंबई, पुण्यानंतर नाशिकचा झपाट्याने विकास होत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याचे शहर म्हणून देशभरात नाशिकला महत्त्व आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून विविध महत्त्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी नाशिकमध्ये केली जात आहे. केंद्राच्या स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत स्मार्ट सिटी म्हणून हे शहर विकसित केले जात आहे. अमृत २ योजनेअंतर्गत केंद्र व राज्य शासनाकडून महापालिकेच्या विविध योजनांसाठी अनुदानस्वरूपात निधी दिला जात आहे. देशातील पहिली एलिव्हेटेड टायरबेस निओ मेट्रो लवकरच नाशिकमध्ये सुरू होत आहे. यासंदर्भातील प्रस्ताव केंद्राच्या अंतिम मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. आयटी पार्क आणि लॉजिस्टीक पार्कसारखे शहर विकासाचे व रोजगार निर्मितीला चालना देणारे प्रकल्पही नाशिकमध्ये होऊ घातले आहेत. मात्र नियोजनाच्या अभावामुळे महापालिकेची पिछेहाट होताना दिसत आहे.

कोणताही मोठा प्रकल्प करायचा असल्यास नाशिक महापालिकेला कोट्यावधी रुपये मोजून सल्लागार संस्थेची निवड करावी लागत आहेत. ही सर्व परिस्थिती असताना आता आयआयटी खरगपूर सारख्या मोठ्या संस्थेचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले आहे. या पथकाचे नेतृत्व सहाय्यक प्रा. सुमना गुप्ता, श्रेयस भारुडे तसेच रिसर्च स्कॉलर अनुभव कुंभारे यांच्यासह पन्नास विविध तज्ञांमार्फत केले जात आहे. हे सर्व मास्टर इन सिटी प्लॅनर या अर्हतेचे तज्ञ असून या पथकामध्ये अनुभवी विशारदासह पर्यावरण, ट्रॅफिक, नियोजनकार असे विविध क्षेत्रांतील तज्ञ आहेत. या पथकामुळे शहराच्या नियोजनबध्द विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (Nashik Kumbh Mela 2027)

नाशिक बनणार ‘इको सिटी’ 

आयआयटी खरगपूरचे पथक आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विविध कामांचा आराखडा तयार करणार आहे. विशेषत: नाशिक शहरामध्ये नवीन तंत्रज्ञानाचे रस्ते कसे करायचे, साधू ग्रामसाठी जागा संपादित करून त्याचा सुनियोजित व दीर्घकालीन कसा वापर करायचा याचा अभ्यास या पथकामार्फत होणार आहे. यासह नाशिकला इको सिटी बनविण्यासाठी या पथकामार्फत स्वतंत्र आराखडा तयार केला जाणार आहे. यात शहरात पर्यावरणपूरक मोठे प्रकल्प कसे उभारता येतील. इको सिटीच्या दृष्टिकोनातून बांधकामे कशी करता येतील, या संदर्भातील उपाययोजनांचा समावेश या आराखड्यात असणार आहे.

आयआयटी खरगपूरचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले असून ते भविष्यात नियोजनबद्ध नाशिकच्या विकासासाठी नवनवीन पर्याय देतील. – हर्षल बाविस्कर, उपसंचालक, नगर रचना

हेही वाचा :

The post कुंभमेळ्यासाठी आयआयटी खरगपूरचे पथक दाखल appeared first on पुढारी.