पंचवटी : पुढारी वृत्तसेवा – पेठ रोडवरील कर्ण नगर परिसरात काही दिवसांपूर्वी वाढदिवसात केक भरविण्याच्या झालेल्या वादातून तीन मित्रांनीच त्यांच्या मित्राचा खून केल्याची घटना गुरुवार (दि ३०) रोजी रात्री साडे दहा ते अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे. तर आशिष दशरथ रणमाळे असे मयताचे नाव असून यातील तीनही संशयित विधी संघर्षित आहे. संशयितांना अवघ्या काही तासात ताब्यात घेण्यात पंचवटी गुन्हे शोध पथकास यश आले आहे. तर या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करीत आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की, कर्णनगर येथील आपला सार्वजनिक वाचनालय समोरील हॅप्पी रो हाऊस येथे दशरथ बाबुराव रणमाळे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास असून त्यांना पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. दशरथ हमाली तर पत्नी घरकाम करतात. तर त्यांचा मुलगा आशिष हा देखील शिक्षण करत हमाली करून हातभार लावत होता. गुरुवार (दि.३०) रोजी रात्री साडे दहा ते अकरा वाजेच्या सुमारास पाच मिनिटांत आलो असे सांगून बाहेर पडला होता. मात्र बराच वेळ होवूनही घरी परत न आल्याने त्याची बहीण त्यास पाहायला गेली व तिने आरडाओरडा सुरू केला, मयताच्या वडिलांनी तात्काळ धाव घेतली. मात्र तोपर्यंत तीनही संशयित काही तरी तीक्ष्ण हत्याराने वार करून पसार झाले होते. शेजाऱ्यांच्या सहकार्याने मयतास उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासत त्यास मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक पडोळकर व पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित या प्रकरणी तीन विधी संघर्षित बालकांना अवघ्या काही तासात ताब्यात घेतले आहे.
“मित्रांकडूनचं घात”
पोलिसांनी ताब्यात घेतलेले संशयित हे सर्व अल्पवयीन असून मयत व संशयित एकमेकांचे मित्र आहेत. काही दिवसांपूर्वी एकाचा वाढदिवशी मित्र – मित्रांमध्ये केक भरविण्याहून वाद झाले होते. यावेळी आशिष याने एकाच्या कानशिलात भडकावली होती. तसेच पुन्हा दोन दिवसांपूर्वी त्यांच्यामध्ये पुन्हा काही तरी वाद झाले होते. आशिषचे मित्र असलेल्या संशयित मित्रांनी गुरुवार (दि. ३०) रोजी कर्ण नगर परिसरातील आपला सार्वजनिक वाचनालय येथे गाठत तीक्ष्ण हत्याराने वर करत त्याचा खून केला.
हेही वाचा: