खंडणी मागणारे तिघे अटकेत; सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

शस्त्रे pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
फॅब्रीकेशनचे काम करणाऱ्या व्यावसायिकाचे अपहरण करून त्याच्याकडून १२ लाख ३० हजार रुपयांची खंडणी घेणाऱ्या टाेळीचा गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने शोध घेतला आहे. यातील तिघांना पोलिसांनी अटक केली असून इतर तिघे फरार झाले आहेत. संशयितांकडून सुमारे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आदित्य एकनाथ सोनवणे (२४, रा. म्हाडा कॉलनी, अंबड लिंकरोड), तुषार केवल खैरनार (२८, रा. म्हसरुळ), अजय सुजित प्रसाद (२४, रा. अंबड लिंक रोड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. व्यवसायात झालेला आर्थिक तोटा व कर्ज फेडण्यासाठी मुख्य संशयित तुषार याने अपहरणाचा कट रचल्याचे समोर आले. राजेशकुमार गुप्ता (रा. म्हसरुळ) यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. ४ मार्च रोजी गुप्ता यांना अपहरणकर्त्यांनी सुयोजित गार्डन येथे फोन करून बोलावून घेतले. तेथे आल्यानंतर त्यांना कारमध्ये बसवून पिस्तुलीचा धाक दाखवून खंडणीची मागणी केली. अपहरणकर्त्यांनी त्यांना मध्यप्रदेश येथील देवास येथे नेले. दरम्यान, गुप्ता यांच्या कुटूंबियांनी १२ लाख रुपयांची तजवीज केली. त्यानंतर दोघा संशयितांनी कुटूंबियांकडून १२ लाख रुपयांची रोकड शहरात घेतली. तसेच अपहरणकर्त्यांनी गुप्ता यांच्या डेबीट कार्डचा वापर करीत ३० हजार रुपये घेतले होते. पैसे मिळाल्यानंतर संशयितांनी गुप्ता यांना देवास येथे सोडून पळ काढला. चार दिवसांनंतर गुप्ता यांनी म्हसरुळ पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तपास करीत टोळीचा छडा लावला. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या पथकाने तपास करीत तिघांना अटक केली. सहायक निरीक्षक हेमंत तोडकर यांच्यासह विष्णू उगले, महेश साळुंके, मिलिंदसिग परदेशी, विलास चारोस्कर, नितीन जगताप, अमोल कोष्ठी, राहुल पालखेडे, अप्पा पानवळ, रवींद्र बागुल, विशाल काठे, प्रदीप म्हस्दे, नाझीम पठाण, प्रशांत मरकड, विशाल देवरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

खंडणीच्या पैशांमधून माैजमजा
संशयितांनी खंडणीचे पैसे मिळाल्यानंतर प्रत्येकी दीड लाख रुपये वाटून घेतले. त्यानंतर संशयित आदित्यने दुचाकी, ॲपलचा मोबाईल, सोन्याच्या रिंगा खरेदी केली. त्याच्याकडून २९ हजार ५०० रुपयांच्या रोकडसह खरेदी केलेला ऐवज असा १ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला तर, संशयित तुषार व अजय यांच्याकडून शेवरलेट कंपनीची क्रुज कार, दोन मोबाईल असा ३ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. संशयितांकडून एकूण ६ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कामगारानेच टीप दिली
पोलिस तपासात गुप्ता यांच्याकडे असलेल्या एका कामगारानेच तुषार यास गुप्ता यांची ‘टीप’ दिली. गुप्ता यांच्याकडे बराच पैसा असून ते पैसे देतील असे सांगितल्यानंतर सहा जणांनी मिळून अपहरणाचा कट रचला. तसेच गुप्ता यांच्या कुटूंबियांकडून १२ लाख रुपयांची रोकड घेण्यासाठी गुप्ता यांच्याकडील संशयित कामगार गेल्याचे सुत्रांनी सांगितले. पोलिस त्याच्यासह इतर दोघांचा शोध घेत आहेत.

The post खंडणी मागणारे तिघे अटकेत; सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.