खून करून रचला मजुराच्या अपघाताचा बनाव

Murder Case pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- निर्माणाधीन इमारतीत काम करत असताना पाय घसरून पडल्याने डोक्यास गंभीर मार लागल्याने मजुराचा मृत्यू झाल्याची नोंद आडगाव पोलिस ठाण्यात होती. मात्र, मृत मजुराच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार, ठेकेदाराने आर्थिक कारणावरून डोक्यात लाकडी दांडा मारून खून केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आडगाव पोलिस ठाण्यात ठेकेदाराविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्यास अटक केली आहे.

जेल रोड येथील दसकगाव येथील रहिवासी शीला गौतम काळे यांच्या फिर्यादीनुसार, आडगाव पोलिस ठाण्यास संशयित तैयब मोहम्मद बाबुजान शेख (रा. जेल रोड) या ठेकेदाराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल आहे. गौतम सखाराम काळे (४०, रा. नाशिक रोड) यांचा शनिवारी (दि. २५) सकाळी आडगाव-म्हसरूळ मेरी लिंक रस्त्यावरील म्हाडा कॉलनीजवळ सुरू असलेल्या बांधकाम साइटवर मृत्यू झाला होता. पाटी वाहत असताना पाय घसरून पडल्याने डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद आडगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. मात्र, गौतम यांची पत्नी शीला यांच्या फिर्यादीमुळे या प्रकरणास वेगळे वळण लागले आहे. गौतम व ठेकेदार तैयब शेख यांच्यात पैशांवरून वाद झाले होते. त्या वादातून ठेकेदाराने शिवीगाळ व दमदाटी करून काळे यांच्या डोक्यात लाकडी बल्लीने मारून खून केल्याचा आरोप शीला यांनी केला. त्यानुसार आडगाव पोलिस तपास करीत आहेत.

हल्ला की अपघात याबाबत तपास

गौतम काळे यांच्या शवविच्छेदन अहवालानुसार त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला. मात्र, ही दुखापत लाकडी दांडक्याने मारल्याने झाली की अपघाताने झाली याचा तपास पोलिस करीत आहेत.

हेही वाचा –