खून प्रकरणातील कैद्याचा शासकीय रूग्णालयात मृत्यू 

कारागृह

जळगाव; पुढारी वृत्तसेवा – खून प्रकरणात संशयित गुन्हेगार म्हणून जिल्हा कारागृहात असलेल्या कैद्याचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान दुर्धर आजाराने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 6) सकाळी घडली आहे. याप्रकरणी जिल्हा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. भीमा उर्फ पंकज अशोक वाणी (वय-४०) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, पुर्ववैमनस्येतून १८ एप्रिल २०१७ रोजी शनीमंदीर परीसरातील एका पत्त्याच्या क्लबमध्ये प्रविण उर्फ नितीन सुरेश माळी या तरूणाच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पंकज वाणी हा मुख्य संशयित आरोपी म्हणून जिल्हा कारागृहात बंदीवान कैदी होता. या प्रकरणात संशयित म्हणून पंकज वाणी आणि राहूल सपकाळे यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो कारागृहातच होता. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून पंकज वाणी याला दुर्धर आजार झालेला होता. त्यामुळे त्याची प्रकृती खालावली होती. ३ फेब्रुवारी रोजी त्याची प्रकृती पुन्हा खालावल्याने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असतांना मंगळवारी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता मृत्यू झाला.

या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची गर्दी पहायला मिळाली. मयत पंकज वाणीच्या पश्चात आई आणि तीन भाऊ असा परिवार आहे.

हेही वाचा :

The post खून प्रकरणातील कैद्याचा शासकीय रूग्णालयात मृत्यू  appeared first on पुढारी.