गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा सहभाग चिंतेचा विषय; समुपदेशनाला सुरुवात

सुरक्षा पोलीस pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा सहभाग चिंतेचा विषय आहे. या मुलांना गुन्हेगारी जगतापासून परावृत्त करीत मूळ प्रवाहात आणण्यासाठी पोलिस आयुक्तालयाने चार संस्थांच्या माध्यमातून विधिसंघर्षित बालकांच्या समुपदेशनाला सुरुवात केली आहे. तसेच प्रत्येक विधिसंघर्षित बालकाचे पालकत्व एका पोलिस अंमलदाराकडे सोपवण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित अंमलदार हे विधिसंघर्षित बालकांच्या वर्तवणुकीवर लक्ष ठेवून त्यांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. (Child In Conflict With Law Under Juvenile Justice (Care and Protection) Act 2015)

गुन्ह्यांमध्ये विधिसंघर्षित मुलांचा सहभाग चिंतेची बाब असून खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, मारहाण, दरोडा, वाहनांची तोडफोड आदी गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग दिसतो. गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या अल्पवयीन मुलांचे भविष्य अंधकारमय होण्याची भीती असते. त्यामुळे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून विधिसंघर्षित बालकांचे समुपदेशन करून त्यांचे परिवर्तन करून त्यांना मूळ प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार इतर संस्थांची मदत घेण्यात येत आहे. बालकांचे समुपदेशन करण्यासाठी बालन्याय मंडळ, स्वयंसेवी संस्था, शासकीय विभागांचे प्रतिनिधी व औद्योगिक संस्थेतील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी पोलिस ठाणेनिहाय समुपदेशन कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. पोलिस अधिकारी समन्वयक म्हणून काम पाहतील. त्यासह विधिसंघर्षित बालकांविरुद्धचे गुन्हे, त्यांचे वास्तव्याचे ठिकाणी, त्यांचे शिक्षण, कुटुंबीयांसह जवळच्या नातलगांची माहिती, मित्रपरिवार, सहकाऱ्यांची माहिती याची नोंद अंमलदारांकडे राहणार आहे. तसेच विधिसंघर्षित बालकाच्या राहण्याचे ठिकाण संबंधित पोलिस चौकी प्रभारीला कळविण्यात येईल. (Juvenile court Nashik)

असे होणार समुपदेशन
विधिसंघर्षित बालकांचे गुन्ह्यांच्या वर्गवारीनुसार समुपदेशन केले जाणार आहे. त्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शनही देणार. स्वयंसेवी संस्थेतर्फे समुपदेशक व मानसोपचारतज्ज्ञ राहतील. डॉ. मृणाल भारद्वाज या समन्वयक असतील. तसेच बालन्याय मंडळाच्या समन्वयक शोभा पवार व प्रणिता तापकिरे या राहणार आहेत. बालन्याय मंडळाच्या आठ सदस्यांचा सहभाग राहणार असून, खादी ग्रामोद्योग आयोगाच्या चार सदस्यांचा सहभाग आहे. औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांचीही मदत घेतली जाईल.

असे असेल पालकत्व
संबंधित पोलिस अंमलदार विधिसंघर्षित बालकांसोबत त्यांचा वैयक्तिक संपर्क वाढवतील. त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करतील. आठवड्यातून दोन ते तीनदा भेट घेतली जाईल. भेटीवेळी पोलिस साध्या वेशात असतील. तसेच विधिसंघर्षित सहभागी होणाऱ्या कार्यक्रमांतही पोलिसांची नजर असेल. विधिसंघर्षित बालकांच्या कुटुंबीयांसोबतही अंमलदार संपर्कात राहतील.

The post गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा सहभाग चिंतेचा विषय; समुपदेशनाला सुरुवात appeared first on पुढारी.