शरद पवार-अनिल कदम यांच्या एकत्र विमानप्रवासात नेमकं दडलय काय?

शरद पवार, अनिल कदम www.pudhari.news

मनोज कावळे: पुढारी वृत्तसेवा

ओझर: अनिलजी तुम्ही वयाच्या कितव्या वर्षी आमदार झालात…कदमांनी वय वर्ष छत्तीस सांगताच शरद पवारांनी तात्काळ उत्तर दिले…तुम्ही ज्या वयात आमदार झालात त्या वयात मी या राज्याचा प्रमुख होतो या दिलखुलास संवादाला निमित्त ठरला तो राष्ट्रवादी काॅग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी आमदार अनिल कदम यांचा नासिक ते नागपुर विमान प्रवास…. यावेळेस पवारांनी कदमांशी झालेल्या संवादात निफाड तालुक्यातील अनेक आठवणींना उजाळा दिला.

जिल्ह्य़ाच्या राजकीय पटलावर बेरकी समजला जाणारा निफाड तालुका हा राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील समजला जातो. इथला सत्ताधारी आणि विरोधी नेता कायमच एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही. विद्यमान आमदार दिलीप बनकर आणि त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी माजी आमदार यांच्यात कधीकाळी विस्तव देखील जात नव्हता. कायम एकमेकांना पाण्यात बघणारे हे दोघे नेते महाविकास आघाडीत राजकीय अपरिहार्याता म्हणुन एकत्र आले. पण ते वळवा वरच पाणीच ठरलं. बाजार समितीच्या निवडणुकीत पुन्हा हे दोघे एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकत उभे राहीले. त्या निवडणुकीत आ.बनकरांनी विजय मिळवला, पण कदमांची पिंपळगाव बाजार समितीत एन्ट्री झाली आणि कुठेतरी या दोघांत असलेल्या विसंवादाचे रूपांतर संवादात सुरू झाले.

राज्यात सत्तातरानंतर अजित पवार यांचे खंदे समर्थक आमदार बनकरांनी अजित पवार गटाची कास धरली. तद्नंतर मात्र बनकर आणि कदम यांनी पुन्हा एकमेकाला शह देण्यास सुरवात केली. सत्तासोपानाच्या या खेळात माजी कदम राज्यातली सत्ता गेल्यावरही उध्दव ठाकरे यांच्याशी आपली निष्ठा कायम ठेवली. दरम्यानच्या काळात कदमांनी शरद पवार यांची देखील भेट घेत पवारांशी स्नेह वाढविण्यास सुरवात केली. राजकारणात भीष्माचार्य समजल्या जाणाऱ्या पवारांनी देखील कदमांना दिल्ली आणि नासिक येथे वेळ देत चर्चा केली. कांद्याची निर्यातबंदीनंतर खुद्द पवारांच्या नेतृत्वाखालील चांदवड येथे शेतकऱ्यांचा रस्ता रोको आंदोलन झाले. या आंदोलनावेळी देखील मोठ्या साहेबांनी कदम यांना मोर्चासमोर बोलण्याची संधी दिली. तर दुसर्‍याच दिवशी पवारांनी अनिल कदम यांच्यासोबत नागपुरला विमानात एकत्रित प्रवास केला. याच प्रवासादरम्यान पवारांनी काकासाहेब वाघ, शेतकरी नेते माधवराव मोरे, माधवराव बोरस्ते, माजी आमदार दुलाजीनाना पाटील, प्रल्हाद पाटील कराड, माजी आमदार मालोजीराव मोगल यांच्या आठवणींना उजाळा दिला.

दोघांचा एकत्रित विमान प्रवास हा तसा योगायोग म्हणता येणार नाही. आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार गट आपली संपूर्ण ताकद कदमांच्या मागे उभी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यमान आमदार दिलीप बनकर यांना शह देण्यासाठी पवार कदमांना बळ देतील, अशी देखील चर्चा आता मतदारसंघात होत आहे.

राष्ट्रवादीकडून कदमांची चाचपणी….?

पुढील वर्षांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार आणि ठाकरे दोन्ही गटांकडून आत्तापासूनच चाचपणीला सुरवात करण्यात आली आहे. ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत, परंतु ते सध्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात गेलेले आहेत तिथे राष्ट्रवादी शरद पवार गट चाचपणी करत आहे. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्ह्य़ातील निफाड मतदारसंघावर आपले लक्ष केंद्रित केले. निफाडचे विद्यमान आमदार दिलीप बनकर हे अजित पवार गटात गेल्यानंतर राष्ट्रवादीने या मतदारसंघात दुसर्‍या उमेदवाराचा शोध घेण्यास सुरवात केली आहे.

निफाड मतदारसंघ हा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला असुन या मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बनकर असल्याने आता शरद पवार गटाने या मतदारसंघावर आपला दावा सांगितला आहे. जयंत पाटील यांनी याबाबत कदम यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याबाबत माजी आमदार अनिल कदम यांनी काय प्रतिसाद दिला हे गुलदस्त्यातच आहे.

हेही वाचा :

The post शरद पवार-अनिल कदम यांच्या एकत्र विमानप्रवासात नेमकं दडलय काय? appeared first on पुढारी.