घरगुती वापराच्या विजेच्या मागणीत १० ते १५ टक्क्यांची वाढ

वीज घरगुती वापर pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यात उष्णतेची लाट पसरली असून, अनेक जिल्ह्यांत तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी गाठली आहे. वाढत्या उकाड्यामुळे घरगुती वापराच्या वीज मागणीत वाढ झाली आहे. मात्र, विहिरींनी तळ गाठल्याने कृषी विभागाच्या वीजवापरात साधारणत: ३० टक्के घट झाली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत राज्यात सुमारे २३ हजार मेगावाॅट विजेची मागणी होत असून, महावितरणकडून ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा केला जात आहे.

एप्रिलच्या प्रारंभी अनेक ठिकाणी पारा ४० अंशांवर जाऊन पोहोचल्याने जनता हैराण झाली आहे. उकाड्यापासून बचाव करण्यासाठी घरोघरी पंखे, कूलरचा वापर वाढला आहे. परिणामी, घरगुती वापराच्या विजेच्या मागणीतही भर पडली आहे. त्यामुळे महावितरणकडून सध्या मागणीप्रमाणे पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दरम्यान, महावितरणकडून दररोज २३ ते २४ हजार मेगावाॅटची वीजनिर्मिती केली जात आहे. यात सुमारे ४५ ते ५० टक्क्यांच्या आसपास वीजपुरवठा घरगुती वापरासाठी होत असतो. उर्वरित ५० टक्क्यांमध्ये कृषी क्षेत्र मोठे असून त्याखालोखाल उद्योग, वाणिज्य व अन्य क्षेत्रासाठी वीजपुरवठा केला जातो. परंतु, सध्याचा उकाडा लक्षात घेता घरगुती वापराच्या विजेच्या मागणीत नेहमीपेक्षा सुमारे १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

उन्हाच्या वाढत्या तीव्रतेसोबत गावोगावी सध्या पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आटले आहेत. विहिरींनीही तळ गाठला आहे. परिणामी, कृषी क्षेत्राच्या वीज मागणीत नेहमीपेक्षा अंदाजे ३० टक्क्यांची घसरण झाली आहे. अन्य क्षेत्रांना त्यांच्या मागणीनुसार पुरवठा केला जात आहे. त्यामुळे एकूणच विचार करता राज्यात सध्या २३ ते २४ हजारांच्या आसपास विजेची मागणी असताना त्या तुलनेत उत्पादनदेखील होत आहे. त्यामुळे घरगुती विजेचा वापर वाढला असला तरी अन्य क्षेत्रातील वीज मागणी कमी झाल्याने पुरवठ्यावर कोठेही कमतरता भासत नसल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

पूर्वीपासून तयारी
राज्यात सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने घरगुती विजेचा वापर वाढला आहे. मात्र, ही मागणी लक्षात घेत महावितरणने यापूर्वीच तयारी केली होती. त्यानुसार विजेची वाढती मागणीचा विचार करून त्या तुलनेत उत्पादन घेतले जात आहे. प्रसंगी खासगी वीज कंपन्यांकडून तसेच केंद्र सरकारच्या ग्रीडमधूनही वीज विकत घेण्याची तरतूद करून ठेवली आहे. त्यामुळे राज्यातील जनतेचा उन्हाळा काहीसा सुकर होणार आहे.

हेही वाचा:

The post घरगुती वापराच्या विजेच्या मागणीत १० ते १५ टक्क्यांची वाढ appeared first on पुढारी.