चिंताजनक! नाशिक जिल्ह्यात आठ प्रकल्प कोरडेठाक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – जिल्ह्यात जूनच्या प्रारंभीच दुष्काळाची दाहकता अधिक तीव्र झाली आहे. 24 प्रमुख धरणांपैकी आठ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. एकूण उपयुक्त जलसाठा १३.१२ टक्क्यांपर्यंत खालावला आहे. ही जिल्ह्याच्या दृष्टीने चिंताजनक बाब आहे. हंडाभर पाण्यासाठी जिल्हावासीयांवर भटकंतीची वेळ ओढवली आहे.

चालू वर्षी दुष्काळाने अवघा जिल्हा होरपळून निघाला आहे. उष्णतेच्या वाढत्या तडाख्याबरोबर जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा झपाट्याने खालावत आहे. प्रमुख धरणांनी तळ गाठला असून, त्यामध्ये अवघा आठ हजार ६१५ दलघफू इतकाच पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत जिल्ह्यामध्ये १८ हजार ९७४ दलघफु जलसाठा हाेता. त्याचे प्रमाण ३० टक्के होते. दरम्यान, जिल्ह्यातील आठ धरणे कोरडी पडली आहेत. त्यामध्ये ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव, भावली, भोजापूर, केळझर, नागासाक्या, माणिकपुंज यांचा समावेश आहे.

नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात १,५२७ दलघफू म्हणजे २७.१२ टक्के साठा आहे. समूहातील चारही प्रकल्प मिळून केवळ २,१८९ दलघफू (२१.५३ टक्के) जलसाठा असल्याने नाशिकमध्ये अघोषित पाणीकपात लागू आहे. जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचा महत्त्वपूर्ण समूह असलेल्या दारणातील सहा प्रकल्प मिळून १३.७७ टक्के म्हणजे २,६०३ दलघफू पाणी उपलब्ध आहे. ओझरखेड समूहातील तिन्ही प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. पालखेड समूहात ८५० दलघफू (१०.२१ टक्के), चणकापूर समूहात २,७३१ दलघफू (११.८४ टक्के) व पुनद समूहात १४.७५ टक्के साठा आहे. गावोगावी पाण्याचे स्रोत यापूर्वीच आटले असताना आता धरणांनी तळ गाठला आहे. त्यामूळे जिल्ह्यातील पाणीसंकट अधिक गडद झाले आहे.

…तरीही प्रतीक्षाच!

केरळात मान्सून डेरेदाखल झाला असून, त्याची पुढील वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे. 7 जूनला तळकोकण व मुंबईत मान्सून वर्दी देईल, असा अंदाज आहे. तसेच १५ जूनपर्यंत तो अवघा महाराष्ट्र व्यापणार आहे. मात्र, जिल्ह्यात पाऊस वेळेवर दाखल झाला, तरी दुष्काळाचे संकट दूर सरण्यासाठी जिल्हावासीयांना काहीकाळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दुष्काळात हेही महत्त्वाचे

  • जिल्ह्यातील आठ धरणे कोरडीठाक
  • सात धरणांमध्ये १० टक्क्यांहून कमी जलसाठा
  • सहा धरणांमध्ये ११ ते २० टक्क्यांदरम्यान साठा
  • दोन धरणांत २५ टक्क्यांहून अधिक पाणी
  • नांदूरमध्यमेश्वर पूर्ण क्षमतेने भरलेले

हेही वाचा: