छगन भुजबळ- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटीने चर्चेला उधाण

हेमंत गोडसे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महायुतीत सहभागी झालेल्या मनसेने नाशिकवर दावा केल्यानंतर तिघांच्या भांडणात चौथ्याचा लाभ होण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. नाशिकमध्ये गोडसे यांना मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी भुजबळ यांना केल्याचे समजते. त्यामुळे नाशिकची उमेदवारी गोडसे यांनाच मिळण्याची शक्यता गडद झाली आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत घमासान सुरू आहे. नाशिकच्या जागेवर शिंदे गटाचाच मूळ दावा असल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र तथा शिंदे गटाचे युवा नेते श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर या वादाला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यानंतर आशा प्रफुल्लित झालेल्या भाजपने नाशिकच्या जागेवर हक्क सांगितला आहे. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशचा पॅटर्न राबविण्याची भूमिका घेतलेल्या भाजपेयींनी नाशिकच्या जागेवर केवळ भाजपचाच उमेदवार निवडून येऊ शकतो, असा दावा करत दिल्लीतील नेतृत्वच नाशिकची उमेदवारी जाहीर करेल, असा पवित्रा घेतला होता. पाठोपाठ राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेदेखील या जागेवर हक्क सांगितल्यामुळे महायुतीत संघर्ष निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील पाच ते सात जागांच्या उमेदवारीचा वाद भाजपचे वरिष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दरबारी पोहोचला आहे. त्यात नाशिकचाही समावेश आहे. महायुतीतील तीनही पक्षांमध्ये नाशिकच्या जागेवरून रस्सीखेच सुरू असतानाच, महायुतीत नव्याने समावेश झालेल्या मनसेनेदेखील नाशिकच्या उमेदवारीवर दावा केल्याने तिघांच्या भांडणात चौथ्याचा लाभ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. भुजबळ व मुख्यमंत्री शिंदे भेटीत नाशिकच्या जागेबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या भेटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गोडसे यांना मदत करण्याचे आवाहन शिंदे यांनी भुजबळांना केल्याचे समजते. त्यामुळे नाशिकची जागा हेमंत गोडसेंनाच मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता नक्की नाशिकच्या जागेवर उमेदवार कोण असणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मविआ उमेदवार बदलणार?
महायुती पाठोपाठ महाविकास आघाडीतही नाशिकच्या जागेवरून ताणातणी सुरू आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने नाशिकमधून विजय करंजकर यांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर केली आहे. त्यास राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने विरोध दर्शविला आहे. नाशिकमधून उमेदवारीसाठी मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे इच्छुक असून, त्यांनी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाकडूनही उमेदवारी बदलाबाबत चाचपणी सुरू असून, आता उमेदवारीसाठी सिन्नरचे राजाभाऊ वाजे यांचे नाव पुढे येत आहे.

हेही वाचा:

The post छगन भुजबळ- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटीने चर्चेला उधाण appeared first on पुढारी.