जनार्दन साळींकडून ‘ज्ञानेेशरी’च्या नऊ हजार ३३ ओव्यांचे हस्तलेखन

ज्ञानेश्वरी लेखन pudhari.news

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा
‘एक तरी ओवी अनुभवावी’ असे म्हटले जाते. पण, संपूर्ण ज्ञानेश्वरीच स्वहस्ताक्षरात लिहिली तर, या विचारातून विंचूर येथील जनार्दन साळी यांनी स्वच्छ आणि सुंदर हस्ताक्षरात ज्ञानेश्वरी लिहून काढली. श्रीमद्भगवद्‌गीतेचे ७०० श्लोक आणि त्यावर ज्ञानेश्वरांनी केलेल्या टीकेच्या नऊ हजार ३३ ओव्या साळी यांनी स्वहस्ताक्षरात लिहिल्या आहेत.

साळी कुटुंब विंचूर येथे अनेक पिढ्यांपासून स्थायिक आहे. रयत शिक्षक संस्थेतून प्रयोगशाळा सहायक म्हणून जनार्दन हे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना वारकरी संप्रदाय आणि स्वामी समर्थ सेवेचा वारसा वडिलांकडून मिळाला. कुटुंबात एकतारी भजन नित्य होत असल्याने सर्वच अभंगांची ओळख त्यांना बालपणापासूनच होती. भजने, गवळणी यांचे स्वर नेहमीच साळी यांच्या घरात उमटत. याबरोबरच सुंदर अक्षराचा दागिना त्यांना मिळालेला असल्याने श्लोक, अभंग, प्रार्थना ते स्वहस्ताक्षरात लिहीत असत. ज्ञानेश्वरी स्वहस्ताक्षरात लिहून ती संग्रही असावी असे त्यांना वाटे. नोकरीमध्ये गुंतलेले असल्याने इच्छा असूनही ती पूर्ण होईना. निवृत्तीनंतर मात्र त्यांनी संकल्पपूर्वक स्वहस्ताक्षरात ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी थेट नेवासा गाठले. संत ज्ञानेश्वर यांनी पैस या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी वाचली. त्या स्थानी जाऊन ज्ञानेश्वरीच्या ११ ओव्या त्यांनी लिहिल्या. त्याबरोबरच हा संकल्प सिद्धीस जावा यासाठी ज्ञानेश्वरांकडे प्रार्थना केली. त्यानंतर स्वगृही परतून वेळ मिळेल तशा रोज २५ ते ५० ओव्या लिहिण्यास प्रारंभ केला. यासाठी त्यांना साडेपाच महिन्यांचा कालावधी लागला. ज्ञानेश्वरीच्या अखेरच्या ओव्या व पसायदान त्यांनी नेवासा येथे जाऊन लिहिले व संकल्प सिद्धीस गेल्याबद्दल आभार मानले. मूळ ज्ञानेश्वरी ग्रंथ ५०९ पानी होता, तर साळी यांचा ज्ञानेश्वरी ग्रंथ ३३७ पानी तयार झाला आहे.

देगलूरकर यांच्याकडून कौतुक
भरवस येथे सुरू असलेल्या वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त कीर्तनसेवा असल्याने चैतन्य महाराज यांची उपस्थिती होती. यावेळी साळी यांनी देगलूरकर यांची भेट घेऊन हस्तलिखित ज्ञानेश्वरी प्रत दाखविली. सुंदर अक्षरांत लिखाण केलेल्या साळी यांच्या उपक्रमाचे देगलूरकर यांनी कौतुक करत लिखित ज्ञानेश्वरी प्रतीवर अभिप्राय नोंदविला.

अन्य संकल्प
पसायदानचे लिखाण पूर्ण झाल्यावर साळी यांनी एकनाथी भागवताचे हस्तलिखाण हाती घेतले आहे. या ग्रंथाच्या ३२ अध्यायांपैकी २४ अध्याय लिहून पूर्ण झाले आहेत. त्यानंतर दासबोध, हरिविजय ग्रंथ स्वहस्ताक्षरात उतरविण्याचा त्यांचा संकल्प आहे.

हेही वाचा:

The post जनार्दन साळींकडून ‘ज्ञानेेशरी’च्या नऊ हजार ३३ ओव्यांचे हस्तलेखन appeared first on पुढारी.