जलजीवन योजना ठरल्या कुचकामी; नांदगाव, देवळ्यात दुष्काळ दाह

टँकर pudhari.news

नाशिक : वैभव कातकाडे

जिल्ह्यातील पाणीटंचाई समस्येचे निराकरण व्हावे, यासाठी अनेक योजना सुरू करण्यात आल्या. त्यासाठी जलजीवन मिशन नावाने हर घर पाणी ही महत्वकांक्षी योजना हाती घेण्यात आली. जिल्ह्यामध्ये ‘जलजीवन’साठी जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचा २६०० कोटींचा आराखडा तयार आहे. आतापर्यंत जवळपास ५० टक्के कामांचे देयके अदा झाली असली तरी देखिल या सर्व योजना कुचकामी ठरल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यात आजघडीला पाणीपुरवठा करण्यासाठी ३९० टँकर्सवर ६० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तसेच २०५ विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत. त्यासाठी दोन कोटी ३२ लाख रुपये खर्च झाला आहे.

 • जलजीवनच्या कामांमध्ये जिल्हा आघाडीवर तरी नांदगाव, येवल्यात १२ दिवसाआड पाणी
 • पाणीटंचाई निवारणासाठी असलेल्या योजनांवर खर्च होऊनही टँकर्सवर खर्च
 • पाणी योजनांवर मॉनिटरींग आवश्यक

जिल्ह्यातील पाणीटंचाई दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. दुष्काळग्रस्तांची तहान भागविण्यासाठी (कागदोपत्री) पाण्यासारखा खर्च हाेत आहे. ३९० टँकर्स आणि २०५ विहिरी अधिग्रहणावर आतापर्यंत ६२ कोटी ३२ लाख रुपये खर्च झालेत. यातील दुष्काळी तालुके म्हणून घोषित करण्यात आलेल्या मालेगाव, येवला आणि सिन्नर तालुक्यामध्ये पाणीटंचाईसाठी नऊ कोटी ३१ लाख रुपयांचा खर्च करण्यात आलेला आहे. पैकी पावणे नऊ कोटी रुपये टँकरसाठी, तर ५६ लाख रुपये विहिरी अधिग्रहणासाठी लागलेत.

राज्यासह जिल्ह्यामध्ये दुष्काळाचे मोठे संकट निर्माण झाले आहे. जिल्ह्याने दरवर्षीप्रमाणे राज्य शासनाकडे जूनअखेर पर्यंतचे खर्चाचे नियोजन पाठविले आहे. त्यानुसार जिल्ह्यात सद्यस्थितीत सुरू असलेल्या टँकर आणि विहिरी अधिग्रहीत करण्यासाठीचा खर्च समोर आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील नाशिक, चांदवड, नांदगाव, बागलाण, देवळा तर दुष्काळी तालुके मालेगाव, येवला आणि सिन्नर यांचा समावेश आहे.

टँकर्सवरील खर्च

 • नाशिक : १० लाख ८० हजार रुपये
 • चांदवड : ३ कोटी १४ लाख ५३ हजार रुपये
 • नांदगाव : ३२ कोटी ०४ लाख २० हजार रुपये
 • बागलाण : ३ कोटी रुपये
 • देवळा : १३ कोटी ५२ लाख ११ हजार रुपये
 • मालेगाव : ३ कोटी १० लाख ५० हजार रुपये
 • येवला : ४ कोटी ५० लाख रुपये
 • सिन्नर : १ कोटी १५ लाख रुपये
 • एकूण : ६० कोटी ५७ लाख १४ हजार रुपये

विहीरी अधिग्रहण

 • चांदवड : ९५ लाख ९५ हजार रुपये
 • नांदगाव : १५ लाख ७० हजार रुपये
 • बागलाण : २८ लाख रुपये
 • देवळा : ३६ लाख ८० हजार रुपये
 • मालेगाव : ३८ लाख १५ हजार रुपये
 • येवला : ३ लाख रुपये
 • सिन्नर : १५ लाख रुपये
 • एकूण : २ कोटी ३२ लाख ६० हजार रुपये

तालुकानिहाय एकूण खर्च

 • नाशिक : १० लाख ८० हजार रुपये
 • चांदवड : ४ कोटी १० लाख ४८ हजार रुपये
 • नांदगाव : ३२ कोटी १९ लाख ९० हजार रुपये
 • बागलाण : ३ कोटी २८ लाख रुपये
 • देवळा : १३ कोटी ८८ लाख ९१ हजार रुपये
 • मालेगाव : ३ कोटी ४८ लाख ६५ हजार रुपये
 • येवला : ४ कोटी ५३ लाख रुपये
 • सिन्नर : १ कोटी ३० लाख रुपये
 • एकूण : ६२ कोटी ८९ लाख ७४ हजार रुपये

हेही वाचा: