जुन्या नाशकात वाहने जाळणारे समाजकंटक जेरबंद

arrested

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मतदानाच्या तीन दिवसांपूर्वी जुन्या नाशकात मध्यरात्री रस्त्यालगत पार्क केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांना आग लावणाऱ्या पाच संशयितांना अटक करण्यात भद्रकाली पोलिसांना यश आले आहे. यासंदर्भात परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संतोष नरुटे, गुन्हे शोध पथकाचे सत्यवान पवार यांनी पत्रकार परिषदेत माहिती माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भद्रकाली ठाण्यात ऐन निवडणूक काळात अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या जुने नाशिक परिसरात समाजकंटकांनी रस्त्यावर उभे असलेल्या वाहनांची जाळपोळ करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

तिघांना शनिशिंगणापूर येथून तर दोघांना नाशिकमधून  अटक

पोलिसांनी या गुन्ह्यातील पाच संशयितांना ताब्यात घेत असून यातील सनी संजय गावडे (२८, रा. पिंपळे गल्ली, म्हसरूळ), प्रशांत बाळासाहेब फळ (३१, रा. विद्यानगर, मखमलाबाद, म्हसरूळ), प्रवीण बाळू कराटे (२४, रा. विद्यानगर, मखमलाबाद, म्हसरूळ) या तिघांना शनी शिंगणापूर येथे सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. तर आकाश राजू साळुंखे (२४, रा. दत्त चौक, सिडको), विजय सुरेश लोखंडे (२८, रा. आडगाव) या दोघांना नाशिकमधून अटक करण्यात आली.

भद्रकाली ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष नरुटे, भद्रकाली गुन्हे शोध पथकाचे सत्यवान पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत गांगुर्डे, नरेंद्र जाधव, सतीश साळुंखे, संदीप शेळके, कय्युम सय्यद, लक्ष्मण ठेवणे, अविनाश जुंद्रे, महेश बारेसे, नितीन भामरे, नारायण गवळी, सागर निकुंभ, धनंजय हासे, निलेश विखे, योगेश माळी, दयानंद सोनवणे, जावेद शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक (प्रशासन) विक्रम मोहिते करीत आहेत.

निवडणूक काळात दहशत

ऐन निवडणूक काळात (दि.१६) मध्यरात्री चौक मंडई भागातील पीर मोहन कब्रस्तान समोरील अमीर लॉज येथे तसेच डॉ. झाकीर हुसेन शासकीय रुग्णालयसमोर व नानावली परिसरात नऊ दुचाकी, एक ट्रक व टेम्पोला आग लावून जाळपोळ केली हाेती. संशयितांनी दहशत निर्माण करण्याच्या हेतूने हा गुन्हा केल्याचे तपासात समोर आले आहे.

हेही वाचा –