जळगाव : पुढारी वृत्तसेवा – शहरातील भवानी मातेच्या मंदिरासमोर असलेल्या सौरभ ज्वेलर्स या दुकानावर सहा दरोडेखोरांनीदरोडा टाकून 32 लाखांचा सोने-चांदीचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी शनिपेठ पोलिसांनी एका संशयितास पुण्यातून तर दोघांना जळगाव शहरातून अटक केली आहे. तर तीन आरोपींचा शोध घेत आहे. हे तीनही संशयित सख्खे भाऊ असल्याचे समोर आले आहे. तर यातील दोघांना पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी तडीपार केले होते.
- एकुण सहा दरोडेखोरांनी मिळून टाकला दरोडा.
- तिघांना अटक केली असून तिघांचा शोध सुरु आहे.
- तब्बल 32 लाखांवर मुद्देमाल चोरुन नेला आहे.
याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सराफ गल्लीमधील भवानी मातेच्या मंदिरासमोर सौरभ ज्वेलर्स हे दुकान आहे. दि. २० मे रोजी पहाटे ३.३० ते ४.१५ वाजेच्या दरम्यान तीन दुचाकींवर आलेल्या अज्ञात ६ दरोडेखोरांनी सौरभ ज्वेलर्स दुकानाच्या पाठीमागून येऊन मागचे चैनल गेट कटरने तोडले. त्यानंतर लाकडी दरवाज्याच्या लहान खिडकीतून आत प्रवेश केला. दरम्यान या दुकानात नेहमी झोपणारे दोन कर्मचारी यांना लोखंडी चॉपरचा धाक दाखवत शांत बसण्याचे सांगितले आणि इतरांनी कटरने सौरभ ज्वेलर्स दुकानाच्या मुख्य दरवाजाचे लॉक तोडले व आत शिरले. या दुकानातून दरोडेखोरांनी सोन्याचे-चांदीचे दागिने, चांदीचे शिक्के व इतर मुद्देमाल असा एकूण ३२ लाख २९ हजार ५७४ रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.
एकाला पुण्यातून, दोघांना जळगावातून अटक
याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गावित यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या. याप्रकरणी प्रभारी पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, पीएसआय चंद्रकांत धनके, किरण वानखेडे, राहुल पाटील, विजय खैरे, अनिल कांबळे, कमलेश पाटील, नवलजीत चौधरी, श्री साबळे या शनिपेठ पोलिसांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे रणजितसिंग जीवनसिंग जुन्नी याला पुण्यातून अटक केली आहे. सागरसिंग जीवनसिंग जुन्नी आणि लकीसिंग जीवनसिंग जुन्नी यांना जळगावातून अटक केली. इतर आरोपींचा शोध पोलीस यंत्रणा घेत आहे.
तीन्ही दरोडेखोर सख्खे भाऊ
यामधील सागरसिंग जीवनसिंग जुन्नी, रणजितसिंग जीवनसिंग जुन्नी आणि लकीसिंग जीवनसिंग जुन्नी हे तीन ही दरोडेखोर सख्खे भाऊ आहेत. यातील सागरसिंग जुन्नी आणि रणजितसिंग जुन्नी या दोघांवर चोरी, हाणामारी, धारदार शस्त्र वापरून दमदाटी करणे असे वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे पोलिसात दाखल आहेत. त्यामुळे या दोघांना डिसेंबर २०२२ मध्ये जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश तत्कालिन जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी काढले होते.
हेही वाचा –