लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- उन्हाच्या तीव्र झळांमुळे बागायतदार शेतकरी चिंताग्रस्त झाले असून, निफाड तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसह इतर फळ बागायतदारांकडून बागा वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे. खेडलेझुंगे, धारणगाव खडक, सारोळे थडी परिसरातील शेतकऱ्यांकडून जुन्या साड्या व इतर कपडे वापरून सावली केली जात असतानाच खेडलेझुंगे येथील युवा शेतकरी संदीप आणि योगेश रमेश घोटेकर यांनी आपल्या साडेतीन एकर डाळिंबाच्या बागेवर नेटद्वारे अच्छादन केल्याने हा प्रयोग शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे. (Nashik Farmers News)
निफाड तालुक्यात खेडलेझुंगे, रुई, धारणगाव खडक, कोळगाव, बोकडदरे परिसरात मोठ्या प्रमाणात फळबागायतदार आहेत. या परिसरामध्ये ऊसलागवडीखालील क्षेत्रही मोठ्या प्रमाणावर आहे. परिसरातून गोदावरी नदीचे पात्र तसेच डावा कालवा, पालखेड कालवा जात असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊसलागवडीसह फळबागा लावलेल्या आहेत. खेडलेझुंगे येथील युवा शेतकरी संदीप आणि योगेश रमेश घोटेकर यांनी साडेतीन एकर क्षेत्रात डाळिंबाची लागवड केली आहे. विहिरीतील जेमतेम पाण्यावर त्यांनी फळबाग जगवली आहे. दरम्यान, वाढत्या उन्हापासून डाळिंबाची बागा संरक्षित करण्यासाठी आणि बदलत्या वातावरणाचा परिणाम होऊ नये म्हणून संदीप आणि योगेश घोटेकर यांनी केलेल्या प्रयोगाची परिसरात चर्चा होत आहे. घोटेकर बंधूंनी बाजारपेठेतून संपूर्ण डाळिंबबागेला संरक्षित करण्यासाठी नेटची खरेदी केली व आपल्या साडेतीन एकर क्षेत्रातील बागेला नेटने आच्छादन केले आहे. त्यामुळे वाढत्या उन्हापासून डाळिंबाचे फळ वाचण्यास मदत होत आहे. (Nashik Farmers News)
उन्हापासून डाळिंब बागांच्या संरक्षणासाठी शेतकरी गरजेनुसार जुन्या साड्या, कापड याचा वापर करतात परंतु, थोड्याशा ऊनवाऱ्यामुळे साड्या, कपडे फाटतात. त्यामुळे नवीन पद्धतीचा वापर नेटच्या सहाय्याने डाळिंबबागेला आच्छादन देऊन फळबागा वाचचण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी मोठा खर्च येत आहे. योग्य भाव मिळणे गरजेचे आहे.
– दिलीप घोटेकर, डाळिंब उत्पादक, खेडलेझुंगे
वाढत्या उष्णतेमुळे डाळिंब झाडे सुकत आहेते, तर बहरातील फळेही तडकत आहेत. उन्हामुळे फळांवर चट्टे पडतात. त्यामुळे फळांचा दर्जाही ढासळतो, तर काढणीयोग्य तयार झालेले फळ टिकवून ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे फळबाग वाचविण्यासाठी नेहमीपेक्षा जास्तीचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
– रमेश घोटेकर, डाळिंब उत्पादक, खेडलेझुंगे
बाजारभाव मात्र उत्पादन अत्यल्प
दोन वर्षांपासून डाळिंबाच्या बागांवर प्लेग, करपा, बुरशी, तेल्या आदी रोगांचा प्रादुर्भाव असल्याने उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक होत आहे. अनेक वर्षांपासून डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
हेही वाचा –