येवल्यातील पाणीप्रश्न पेटला, अमृता पवार यांच्यावर गुन्हा दाखल

छगन भुजबळ, अमृता पवार, www.pudhari.news

येवला(जि. नाशिक):पुढारी वृत्तसेवा– राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळांच्या मतदारसंघात पाणी प्रश्न चांगलाच पेटला आहे. जानेवारी महिन्यात पालखेड डावा कालव्याला काही ठराविक चारीला पाणी दिले नाही म्हणून त्यांचे गेट तोडून पाणी सोडणाऱ्या भाजपच्या नेत्या अमृता वसंत पवार यांच्यावर येवला तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महिन्याभरापूर्वीच्या घटनेचे तक्रार पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी राजकीय दबावातून आत्ता महिनाभर उशिराने दिल्याची चर्चा होत आहे.

राज्याच्या सत्तेत एकत्र असलेल्या महायुतीत यानिमित्ताने गृहकलहाची सुरुवात झाली आहे. वर्षानुवर्ष दुष्काळी असलेल्या येवला मतदारसंघात पाण्याच्या प्रश्नावरून भाजप अमृता पवार यांच्या नेतृत्वात आक्रमक झाली आहे.

मागील महिन्यात पालखेड कालव्यावरील चारी क्रमांक 25 आणि 28 येथे शेतकऱ्यांवर पाणी देण्यात अन्याय होत असल्याने या चारी भाजपच्या अमृता पवार व समर्थकांनी फोडल्या होत्या. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करून त्यांना अटक करण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून यंत्रणेवर दबाव आणण्यात आला अशी चर्चा केली जात होती अमृता पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियादेखील सुरू होती. मात्र ग्रामस्थांच्या विरोधामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे टाळले होते.

गेल्या जानेवारी महिन्यात पाटबंधारे विभागाने नाशिकचे दादा भुसे यांच्या सूचनेनुसार येवला मतदारसंघात पालखेड धरणाच्या चाऱ्यांना पिण्यासाठी पाणी सोडले. मात्र असे करताना दुजाभाव होत असल्याने ग्रामस्थ संतापले अनेक ठिकाणी ग्रामस्थांनी आधी मागणी नोंदवून आणि शुल्क भरूनदेखील त्यांना पाणी मिळू नये, म्हणून काही राजकीय यंत्रणा काम करीत असल्याचा आरोप केले जात होते.

हेही वाचा :

The post येवल्यातील पाणीप्रश्न पेटला, अमृता पवार यांच्यावर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.