डॉक्टर दाम्पत्याविरोधात गुन्हा : उपचारात हलगर्जीपणाचा ठपका

surgery pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

त्वचारोग किंवा प्लास्टिक सर्जरीचे उपचार करण्यासाठी पात्र असलेली पदवी किंवा शैक्षणिक पात्रता नसतानाही रुग्णावर उपचार करून त्याच्या नाकास डॉक्टर दाम्पत्याने गंभीर दुखापत केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रुग्णाने सरकारवाडा पोलिस ठाण्यात डॉ. जयदीप घोषाल व डॉ. सुजाता घोषाल यांच्याविराेधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंचवटीतील अयोध्यानगरी येथील २४ वर्षीय उद्योजक मे २०२० मध्ये नाकावरील डाग काढण्यासाठी कॅनडा कॉर्नर येथील स्किनेरेला ॲस्थेटिक स्कीन, हेअर ॲण्ड लेझर क्लिनिकमध्ये गेला. क्लिनिक डॉ. सुजाता घोषाल यांच्या नावे असतानाही संशयित डॉ. जयदीप घोषाल याने स्वत: कुशल व अनुभवी डॉक्टर असल्याची माहिती उद्योजकास दिली. त्यामुळे उद्योजकाने डॉक्टरवर विश्वास ठेवत उपचार सुरू केले. मात्र, उपचारानंतर नाकावरील व्रण जाण्याऐवजी ते वाढले व नाकास गंभीर दुखापत झाली. यात डॉ. जयदीपने भुलीविना वेदनादायक उपचार केल्याचे आरोप उद्योजकाने केले. उद्योजकाच्या तक्रारीनंतर यंत्रणांनी चौकशी केल्यानंतर आरोपांमध्ये तथ्य आढळले. त्यानुसार सरकारवाडा पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासकीय यंत्रणांनी केली चाैकशी
संबंधित उद्योजकाने सरकारवाडा पोलिसांसह जिल्हा शल्यचिकित्सक व मनपा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक व मनपा अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत उद्योजकावरील उपचारात निष्काळजी व हलगर्जीपणा झाल्याचा अहवाल दिला. त्यामुळे उद्योजकावर चुकीचे उपचार झाल्याचे प्राथमिक अहवालात समोर आले असून, त्यांची आर्थिक फसवणूकही झाली आहे.

हेही वाचा:

The post डॉक्टर दाम्पत्याविरोधात गुन्हा : उपचारात हलगर्जीपणाचा ठपका appeared first on पुढारी.