नाशिक ः पुढारी वृत्तसेवा- प्रतिष्ठेच्या धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपने उमेदवारी जाहीर करून आघाडी घेतली आहे, तर महाविकास आघाडी उमेदवाराची अद्यापही प्रतीक्षा आहे. नाशिक आणि धुळे जिल्ह्यांतील प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघांना गवसणी घालणाऱ्या या लोकसभा मतदारसंघात मुस्लीम मतदारांची दखलपात्र संख्या लक्षात घेता घोषणा झाल्याप्रमाणे एमआयएम स्वतंत्र उमेदवार देते का, यावर महायुती वा महाविकास आघाडी उमेदवाराच्या विजयाचे प्रमेय अवलंबून राहणार असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात येत आहे.
धुळे शहर आणि ग्रामीण, शिंदखेडा, बागलाण, मालेगाव मध्य आणि बाह्य या विधानसभा क्षेत्रांचा या मतदारसंघात समावेश होतो. महायुतीत ही जागा भाजप, तर महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाटेला आली आहे. पैकी भाजपचे डॉ. सुभाष भामरे तिसऱ्यांदा नशीब अजमावत आहेत. काहीशा नाराजीमुळे डॉ. भामरे यांच्यावर श्रेष्ठी मेहेरबान होतात की नाही, अशी शंका असताना पक्षाने तिसऱ्यांदा त्यांच्यावर विश्वास दर्शवला आहे. या मतदारसंघात सहापैकी मालेगाव मध्य आणि धुळे शहर मतदारसंघात एमआयएम पक्षाचे आमदार आहेत. ही बाब लक्षात घेऊन एमआयएमने स्वतंत्र उमेदवार देण्याची प्राथिमक घोषणा केली आहे. गतवेळी वेगळा उमेदवार न देता मुस्लीम समाजाने काँग्रेसच्या कुणाल पाटील यांच्या पदरात मतं टाकल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. याच अनुषंगाने विजयाची हॅट्ट्रिक नोंदवण्यासाठी आतुर असलेल्या डॉ. भामरे यांना काँग्रेस उमेदवार कोण, यापेक्षा एमआयएम उमेदवार देते का, याचे औत्सुक्य आहे.
धुळे मतदारसंघात गेल्या तीन निवडणुकांत भाजप उमेदवारांनी काँग्रेसला मात दिली आहे. यावेळी काँग्रेसकडून अद्याप उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. पक्षाचे धुळे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर आणि नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या नावांची त्यासाठी चर्चा आहे. कुणाल पाटील यावेळी मैदानात उतरण्यास अनुत्सुक आहेत. वंचित बहुजन आघाडीचा या मतदारसंघातील प्रभाव जेमतेम आहे. ही बाब लक्षात घेता धुळ्यातील लढत महायुतीविरोधात महाविकास आघाडी यांच्यातच होणार हे निश्चित आहे. एमआयएम उमेदवाराच्या माध्यमातून मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण झाल्यास ते भाजपला फायदेशीर ठरणार आहे. धुळे शहर आणि मालेगाव मध्य विधानसभा क्षेत्रांतील एमआयएम आमदारांना प्राप्त झालेल्या मतांची एकत्रित संख्या १.६४ लाखांच्या घरात आहे. हे प्रमाण महाविकास आघाडीला मारक ठरणार आहे. याच अनुषंगाने काँग्रेस आणी एमआयएम उमेदवार कोण, हा मतदारांइतकाच भाजप उमेदवाराच्या औत्सुक्याचा भाग राहणार हे निश्चित.
सर्वांना सांभाळण्याचे डॉ. भामरेंपुढील आव्हान..
धुळे मतदारसंघात भाजपकडून डॉ. भामरे यांच्यासोबत निवृत्त पोलिस अधिकारी प्रताप दिघावकर, गुजरात भाजप अध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या कन्या तथा धुळे जि. प.च्या माजी अध्यक्ष धरती पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, डॉ. विलास बच्छाव आदी नावांची चर्चा होती. पैकी दिघावकर यांनी तर भेटीगाठींचा सिलसिलाही सुरू केला होता. मात्र, डॉ. भामरे हेच पक्षनेतृत्वाची पसंती ठरले. शिवसेनेचा शिंदे गट ही जागा लढवण्याची अटकळही बांधण्यात येत होती. त्यासाठी नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे यांचे पुत्र आविष्कार यांचे नाव पुढे आले होते. तथापि, जागांच्या अदलाबदलीची मात्रा न चालता इथे पूर्वीप्रमाणेच गणित राहिले. तिकिटाच्या स्पर्धेत असलेल्यांसह सवंगडी शिवसेना शिंदे गट यांना आपलेसे करून घेण्याची किमया डॉ. भामरे यांना साधावी लागणार आहे.
हेही वाचा :
- Amol Kirtikar | ठाकरे गटाचे उमेदवार अडचणीत; खिचडी घोटाळा प्रकरणात अमोल किर्तीकर यांना ईडीचे समन्स
- पुरंदर तालुका पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात : शिवतारे यांनीही थोपटले दंड
- पुरंदर तालुका पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात : शिवतारे यांनीही थोपटले दंड
The post डॉ. भामरेंची हॅट्ट्रिक होणार की चुकणार? धुळ्यात महाविकास आघाडीचेच आव्हान appeared first on पुढारी.