तपशील आयोगाकडे सादर : उमेदवारांच्या मालमत्तेत पटींनी वाढ

गोडसे भारती पवार pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या संपत्ती मागील पाच वर्षांत दीडशे पटींनी वाढ झाली आहे. गोडसे कुटुंबाची मालमत्ता १६ कोटी ७३ लाख ४ हजार ७८८ रुपये आहे. त्यांच्या नावे सहा कोटी ६१ लाख ४२ हजार ६८८ रुपयांचे कर्जदेखील आहे.

लोकसभेच्या जागावाटपात सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघातून अखेर गाेडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रात त्यांनी मालमत्तेचा तपशील आयोगाकडे सादर केला आहे. २०१९ च्या निवडणुकीत गोडसे व त्यांच्या कुटुंबांकडे साधारणत: ६ कोटी ३५ लाखांची संपत्ती होती. यंदाच्या निवडणुकीत गोडसे कुटुंबाची जंगम व स्थावर अशी एकूण मालमत्ता १६ कोटी ७३ लाख ४ हजार ७८८ रुपयांवर पोहचली आहे.

गाेडसे यांच्याकडे ५ लाख ७ हजार ४९७ तर पत्नी अनिता यांच्याकडे २ लाख १८ हजार ५२४ रुपयांची रोकड आहेत. तसेच गोडसेंकडे साेन्या-चांदीचे १२० ग्रॅमचे दागिने असून त्याचे मुल्य ३ लाख ६० हजार ५०० रुपये आहे. पत्नी अनिता यांच्या नावे ४ लाख ८० हजार ५०० रुपयांचे १६० ग्रॅम वजनाचे दागिने आहे. गोडसे दाम्पत्याच्या दिमतीला तीन चारचाकी वाहने आहे. संसरी, लॅमरोड येथे सदनिका, जिल्हा परिषदेच्या मागे मालमत्ता याशिवाय वर्डिलोपार्जित शेतीजमीन आहे. विविध बँका व पतसंस्था तसेच कंपन्यांमध्ये गोडसेंचे शेअर्स आहेत.

चव्हाणांच्या नावे ६.४० लाखांचे कर्ज
माजी खासदार हरिशचंद्र चव्हाण यांनी दिंडोरीतून अपक्ष अर्ज दाखल केले. चव्हाणांच्या नावे ६ लाख ४० हजारांचे कर्ज असून त्यांची पत्नी कलावती यांच्या डोक्यावर २० लाख ६८ हजार ४९२ रूपयांचे कर्ज आहे. चव्हाण दाम्पत्याची एकुण संपत्ती १७ कोटी ४७ लाख ८३ हजार ५३२ रूपयांची आहे. तसेच गंगापूर रोड, अंधेरी (मुंबई), प्रतापगड (सुरगाणा), राजुरबहुल्यात मालमत्ता आहे. चव्हाणांकडे स्व:तचे ३८ ग्रॅम सोने असून त्याचे मुल्य २ लाख ७७ हजार ४०० रुपये आहे. पत्नीच्या नावे ७ लाख ६६ हजार ५०० रुपये मुल्याचे १०५ ग्रॅम सोने आहे. चव्हाण दाम्पत्याकडे दोन चारचाकी आहेत.

डॉ. पवार यांच्या संपत्तीत देखील पाच वर्षांत १० कोटींची वाढ झाली असून पवार कुटुंबाकडे २२.८५ कोटींची मालमत्ता आहे. दिंडाेरी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या संपत्तीत पाच वर्षांत ९ कोटी ८५ लाख ९८ हजार १६४ रुपयांची वाढ झाली आहे. पवार कुटुंबांकडे आजमितीस एकूण २२ कोटी ८५ लाख ९८ हजार १६४ रुपयांची मालमत्ता आहे. त्यांच्या नावे जमावबंदीचा गुन्हा दाखल असून स्वत:चे वाहन नाही.

डॉ. पवार यांनी गुरुवारी (दि.२) त्यांचा नामनिर्देशन अर्ज दाखल केला. अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात कौटुंबिक मालमत्तेचे विवरण नमूद केले आहे. पवार कुटुंबांची एकत्रित जंगम मालमत्ता २ कोटी १ लाख १७ हजार १६४ रुपये आहे. स्थावर मालमत्ता २० कोटी ८४ लाख ८१ हजार इतकी आहे. त्यानूसार एकूण मालमत्ता २२ कोटी ८५ लाख ९८ हजार १६४ रुपये इतकी आहे. तसेच प्रविण पवार यांच्याकडे बॅंक आॅफ बडोदाचे २ लाख ७५ हजार रुपयांचे सोलरसाठीचे कर्ज आहे.

पवार यांनी २०१९ च्या निवडणुकीत त्यांची कौटुंबिक संपत्ती १३ कोटी रुपये दाखविली होती. त्यावेळी पवारांकडे स्वत:ची जंगम मालमत्ता ५३ लाख ४२ हजार ७५४ व ३० लाख रुपयांची स्थावर मालमत्ता होती. पती प्रविण पवार यांची त्यावेळी जंगम मालमत्ता ६ लाख ८० हजार ६२ रुपये होती. त्यावेळी प्रवीण पवारांच्या डोक्यावर १० लाख ७६ हजार ९७५ रुपयांचे कर्ज होते. दरम्यान, २०१९ शी तुलना केल्यास पवार कुटुंबाच्या संपत्ती पाच वर्षांत ७५ टक्यांची घसघशीत वाढ झाली आहे.

जागा, साेने नावावर
पवार कुटुंबाकडे दळवट (कळवण), नाशिक शहरातील गंगापूर रोड, म्हसरुळ, मखमलाबाद तसेच महादेवपूर व देवगाव (ता. त्र्यंबकेश्वर) येथे शेतजमीन व बिगर शेतजमीन नावावर आहे. या शिवाय डॉ. पवारांकडे १८० ग्रॅम सोने असून त्याचे मुल्य ५ लाख ६० हजार रुपये आहे. तर १ लाख ८ हजार रुपये किंमतीची १ किलो ३५० ग्रॅम चांदी आहे. पती प्रविण यांच्याकडे साडेतीन लाखांचे ५० ग्रॅम, मुलीकडे १ लाख ५ हजारांचे १५ ग्रॅम व मुलाच्या नावे ७० हजार रुपयांचे १० ग्रॅम सोने नावावर आहे. तसेच विविध बँका व कंपन्यांमध्ये शेअर्स असून विमा पॉलिसी आहेत.

हेही वाचा: