‘त्या’ वक्तव्यावरून शरद पवार गट बॅकफूटवर

जयंत पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील माकपचे उमेदवार जे. पी. गावित यांच्या नाराजीचा फटका थेट महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता बळावल्याने शरद पवार गटाच्या नेत्यांनी रविवारी (दि.५) तातडीची पत्रकार परिषद घेतली. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नाशिक दाैऱ्यातील वक्तव्याचा विपर्यास केल्याचे सांगत गावितांप्रती आम्हाला आदर असल्याचा खुलासा करण्याची वेळ आघाडीच्या नेत्यांवर ओढावली.

नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी २९ एप्रिलला नामनिर्देशन पत्र भरले. यावेळी महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेप्रसंगी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी भाजपकडून काही जण काॅन्ट्रॅक्ट घेऊन उमेदवारी करत असल्याचा उल्लेख केला. त्यांच्या वक्तव्याचा रोख थेट माजी आमदार गावित यांच्याकडे असल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे गावित व त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली. आघाडीचे दिंडोरीतील उमेदवार भास्कर भगरे यांना नाराजीची किंमत मोजावी लागण्याचा अंदाज नेत्यांना आला. त्यामुळे स्थानिक नेत्यांनी तत्काळ पत्रकार परिषद घेत वक्तव्याबद्दल खुलासा केला.

सभेप्रसंगी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी भाजपच्या कॉन्ट्रॅक्टवर उमेदवारी करण्याबाबतच्या वक्तव्यावेळी कोणाचाही नामोल्लेख केलेला नाही. त्यामुळे गावितांबद्दल ते वक्तव्य असण्याचा विषय नव्हता असा दावा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांनी केला. जळगाव येथे खा. शरद पवार व गावित यांची भेट झाली. या भेटीत वक्तव्याबाबत पवार यांनी गावितांची नाराजी दूर केल्याचे सांगत जिल्ह्यात महाविकास आघाडी एकसंध असल्याचा दावाही त्यांनी केला. साेमवारी (दि. ६) माघारीची अंतिम मुदत असून, गावित योग्य तो निर्णय घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी पवार गटाचे सरचिटणीस नितीन भाेसले, पक्षाच्या जिल्हा निरीक्षक तिल्लोत्तमा पाटील, शहराध्यक्ष गजानन शेलार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल आदी उपस्थित होते.

पत्राचे जाहीर वाचन

जळगाव भेटीत खा. पवार यांनी गावितांची नाराजी दूर करताना पाटील यांच्या वक्तव्याच्या खुलाशासंदर्भात पत्र दिले. या पत्रात गावित हे त्यांच्या विचारांशी सुसंगत असून, निर्मळ पद्धतीने सार्वजनिक जीवन जगत आहेत. त्यामुळे अशा व्यक्तीबद्दल गैरसमज टाळण्यासाठी पत्रातून स्पष्टीकरण केल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी पत्राचे जाहीर वाचनही केले.

—-