त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी खुले राहणार; गर्भगृह दर्शन मात्र बंद

त्र्यंबकेश्वर pudhari.news

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क
बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेले नाशिकचे त्र्यंबकेश्वर मंदिर असून येथे महाशिवरात्रीनिमित्त भाविकांचा जनसागर लोटला असतो. यंदाच्या महाशिवरात्रीनिमित्त देखील श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे जय्यत तयारी सुरु करण्यात आली असून आकर्षक फुलांच्या सजावटीने त्र्यंबकेश्वर मंदिर सजवले जाणार आहे. शुक्रवार (दि.८) आणि शनिवारी (दि.९) महाशिवरात्र निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. शुक्रवारी (दि.८) पहाटे चारपासून शनिवारी (दि.९) रात्री नऊपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे. शहरासह दूरवरुन येणाऱ्या भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता गर्भगृह दर्शन मात्र बंद ठेवण्यात आलेले आहे.

श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. गर्भगृह, सभामंडप, प्रवेशद्वार उत्तर आणि पूर्व महाद्वार या ठिकाणी विविध आकर्षक फुलांची सजावट करण्यात येणार आहे. भाविकांची सोय दर्शन मंडपातून व त्यांच्या दोन्ही बाजूंमध्ये करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तातडीने दर्शन घेण्यासाठी देणगी दर्शन सुरू राहणार आहे.

महाशिवरात्रीनिमित्त देवस्थानच्या वतीने दोन दिवसांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून आज गुरुवार (दि.७) मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता गायक प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन यांचे गायन तर शनिवार (दि.९) रोजी सायंकाळी ७ वाजता ओम नटराज अकॅडमीतर्फे पारंपरिक कथ्थकचा कार्यक्रम होणार आहे. देवस्थानच्या वतीने परंपरेनुसार शुक्रवारी (दि.८) दुपारी ३ वाजता श्री त्र्यंबकराजांची पालखी मंदिरातून निघून पारंपरिक मार्गानुसार कुशावर्तावर पूजन करण्यात येणार आहे. तर सायंकाळी ५ वाजता पालखी देवस्थानच्या पटांगणात येईल. यावेळी लघुरूद्राभिषेक करण्यात येईल. विशेष महापूजा आणि पालखी सोहळा हा रात्री ११ ते अडीच या वेळेत होणार आहे. भाविकांनी तसेच ग्रामस्थांनी या विविध धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन विश्वस्तांच्या वतीने करण्यात आले आहे.

The post त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी खुले राहणार; गर्भगृह दर्शन मात्र बंद appeared first on पुढारी.